Headlines

तरुणींचे अर्धनग्न फोटो मागणाऱ्या कथित बाबाला अटक:शारीरिक व्यायामाच्या नावाखाली 'निगेटिव्ह एनर्जी' काढण्याचे आमिष




मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे भासवून तरुणींना शारीरिक व्यायामाच्या नावाखाली अर्धनग्न फोटो पाठवण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दिव्य जितेंद्र परमार (रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणवून घेत असे. त्याने तरुणीच्या शरीरात ‘निगेटिव्ह एनर्जी’ गेल्याचे सांगून ती काढण्यासाठी अर्धनग्न फोटो पाठवण्याची मागणी केली आणि तिला धमकावले, असे तक्रारीत म्हटले आहे. परमार हा महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून स्वतःचा प्रचार करत होता. त्याने समाजमाध्यमांवर स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून मोठा चाहता वर्ग निर्माण केला. पुण्यात तो दरवर्षी दोन-तीन सेमिनार आयोजित करत असल्याची माहिती आहे. काही काळानंतर त्याने स्वतःला ‘बाबा’ म्हणण्यास सुरुवात केली आणि त्याच्या अनुयायांमध्ये त्याच्याबद्दल देवत्वाची भावना निर्माण झाल्याचा आरोप आहे. व्यायामाच्या टिप्स देण्याच्या बहाण्याने त्याने इतर काही महिला व तरुणींकडूनही अशाच प्रकारे फोटो मागवून त्यांचा गैरवापर केल्याचे प्रकार तपासात समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील माहितीची सखोल तपासणी सुरू आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम 75, 78, 79, 318(4), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *