Headlines

राहुल गांधींच्या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाला:विविध क्षेत्रातील नामांकित महिलांचा पाठिंबा, 22 जूनला पुण्यात संवाद




विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या २२ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ‘छात्रों की गुंज’ या अभियानांतर्गत ते पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, विधितज्ञ रमा सरोदे, लेखिका ऐश्वर्या रेवाडकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पल्लवी माळी लडकत यांसारख्या नामांकित महिलांनी पाठिंबा दर्शवला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. चित्रपट निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “राजकीय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा थेट सहभाग आणि संवाद असणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधी सामान्य लोकांशी मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत, हे स्वागतार्ह आहे. एक नागरिक म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत.” अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणाल्या, “मी एक भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे, पण त्याहून अधिक भूमिका घेणारी नागरिक आहे. सावित्रीबाई फुले, जिजाऊ, रमाई, पंडिता रमाबाई, मुक्ता जावळे, फातिमा शेख यांच्या पुण्यात राहुल गांधी मुलींच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी येत आहेत. एक कलाकार म्हणून मी त्यांच्यासोबत आहे.” ॲड. रमा सरोदे यांनी महाराष्ट्रातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रामध्ये महिला-मुलींचे गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा आणि त्यांचे भविष्य यावर भाष्य करण्यासाठी राहुल गांधी पुण्यात येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे.” स्त्रीवादी लेखिका ऐश्वर्या रेवाडकर यांनी सरकारी शाळांच्या स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “बंद पडत असलेल्या सरकारी शाळांमुळे मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. बहुजन समाजाच्या मुलींचे शैक्षणिक भविष्य सरकारी शाळा आणि तेथील पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. खासदार राहुल गांधी यांनी यावर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.” डॉ. पल्लवी माळी लडकत यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “नीट परीक्षा पेपरफुटी हे केंद्र सरकारचे अपयश आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी यातून अधोरेखित होते. आंदोलक विद्यार्थिनींना झालेली मारहाण निषेधार्ह असून, एक पालक आणि डॉक्टर म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो.” या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रेहाना चिस्ती, बी. एम. संदिप, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सिमा गुट्टे आणि वंदनाबेन उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *