Headlines

डीएसकेकडून 11 हजार गुंतवणूकदारांची 610 कोटींची फसवणूक:पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केली माहिती




पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या विविध कंपन्यांनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक योजनांद्वारे 11 हजारांहून अधिक नागरिकांची सुमारे 610 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला नागरिकांच्या तक्रारींमध्ये फसवणुकीची रक्कम 1300 कोटी रुपये असल्याचे समोर आले होते, परंतु बँक रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर ही प्रत्यक्ष रक्कम निश्चित करण्यात आली. कोथरुड येथील एका 65 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून 28 ऑक्टोबर 2017 रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी यांच्यासह 19 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी नुकतीच उच्च न्यायालयात माहिती सादर केली. तपासादरम्यान, एकूण 11 हजार 213 गुंतवणूकदार या फसवणुकीला बळी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी विविध कंपन्या आणि आकर्षक गुंतवणूक योजना सुरू करून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांकडून जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम नंतर इतर सहकारी कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर फसवणुकीची मोठी रक्कम लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित कंपन्या, संचालक आणि आरोपींच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार तपासले. जमा झालेली रक्कम, गुंतवणूकदारांना परत केलेली रक्कम आणि इतर आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी करून फसवणुकीचा नेमका आकडा निश्चित करण्यात आला. या प्रकरणात सुरुवातीला एकूण 19 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार जणांना न्यायालयाच्या आदेशाने गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले आहे, तर उर्वरित 15 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, आरोपींनी फसवणुकीतून अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अशा 463 स्थावर मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. याव्यतिरिक्त, 20 फेब्रुवारी 2026 रोजी आणखी सहा मालमत्ता संरक्षित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *