![]()
केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत त्यांनी रेल्वे प्रशासनाला विकासकामांना गती देण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण यावर ठोस सूचना केल्या. मोहोळ यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्देश दिले. प्रस्तावित अतिरिक्त सहा प्लॅटफॉर्मच्या कामाचे नियोजन प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून दीर्घकालीन दृष्टिकोनातून करावे, जेणेकरून भविष्यात वारंवार फेरबदल करण्याची वेळ येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या प्रश्नावरही त्यांनी विशेष भर दिला. स्थानकावरील सर्व अनधिकृत प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तातडीने बंद करावेत, तसेच संरक्षक भिंत अधिक मजबूत करावी, अशी सूचना त्यांनी केली. स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर २४ तास टीसी आणि आरपीएफ कर्मचारी उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली. पावसाळ्यात पुणे रेल्वे स्थानक परिसरात, प्लॅटफॉर्मवर आणि कार्यालयांमध्ये पाणी साचणे व गळती होण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. पार्सल कार्यालयात पावसाचे पाणी शिरून ग्राहकांच्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठीही दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा अनेक मागण्या मोहोळ यांनी केल्या. यामध्ये रेल्वेगाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक किमान ३० मिनिटे आधी जाहीर करणे, स्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची योग्य देखभाल करणे, तसेच खानपान सेवांमधील जादा दर, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी दूर करणे यांचा समावेश आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खानपान कंत्राटदारांवर निलंबन आणि करार समाप्तीची कारवाई करावी, तसेच स्थानकावरील पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्सल आदी कंत्राटांमध्ये होणारी अतिरिक्त वसुली थांबवावी, असेही त्यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देशही मोहोळ यांनी दिले. पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड परिसरातील रेल्वेच्या मोक्याच्या जागांचा योग्य व्यावसायिक वापर करून रेल्वेला महसूल मिळवून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रेल्वेच्या मौल्यवान जागांचे संरक्षण करतानाच त्यांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
Source link
केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या रेल्वे प्रशासनाला ठोस सूचना:पुणे विभागातील विकासकामे, सुरक्षा आणि अतिक्रमणांवर भर