Headlines

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची 24 लाखांची फसवणूक:पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला




पुण्यात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत विठ्ठल सपकाळ (वय 46, रा. तळेगाव दाभाडे) आणि योगेश अदिकराव पाटील (वय 42, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात एका 45 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. ही महिला पर्वती भागातील लक्ष्मीनगर वसाहतीत राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची डिसेंबर 2023 मध्ये आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींपैकी एकाने आपण महसूल खात्यात अधिकारी असल्याचे महिलेला सांगितले. त्याने मंत्रालयात ओळख असल्याचे भासवून महसूल, सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, कृषी आणि राज्य उत्पादन शुल्क या विविध विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून महिलेने आरोपींना वेळोवेळी एकूण 24 लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी महिलेला समाजकल्याण आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेली नियुक्तीपत्रे दिली. महिलेने या नियुक्तीपत्रांची चौकशी केली असता, ती बनावट असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करत आहेत. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाची 13 लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कपिल मेंदरकर, डायरेक्टर ऑफ मेंदरकर स्टॉक मर्चंट (रा. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, बार्शी, जि. सोलापूर) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील चरणदास अग्रवाल (वय 57, रा. दत्त दिगंबर सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 नोव्हेंबर 2023 पासून दि. 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला आर्थिक फायदा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण 13 लाख रुपये पाठविले. मात्र, गुंतविलेली रक्कम अथवा ठरलेला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *