Headlines

अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार!:हसन मुश्रीफांचा ठाम दावा, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचेही कौतुक




महायुती सरकारमधील खातेवाटपाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत राज्यातून मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात तब्बल 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. महायुतीतील खातेवाटपाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “प्रसारमाध्यमांत अनेक चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटातील आमदार-खासदार एनडीएमध्ये येणार, अशा बातम्या सुरू आहेत. मात्र भविष्यात काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.” ‘अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळेल’ अर्थ खात्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “अर्थ खाते निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल. आमच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आहे. आम्ही पुन्हा अमित शहा आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत.” शिवसेनेच्या काही नेत्यांकडून अर्थ खाते राष्ट्रवादीकडे जाऊ नये, अशी भूमिका घेतली जात असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “युतीमध्ये अशा प्रकारे चालत नाही. सुरुवातीला जे ठरले आहे, त्यानुसारच निर्णय व्हावा, ही आमची अपेक्षा आहे.” जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “ते नगरविकास विभागाशी संबंधित एका स्थानिक विषयासाठी भेटले होते. त्यापलीकडे काय चर्चा झाली, याची माहिती आम्हाला नाही.” ‘भाजप शब्द पाळेल’ महायुतीतील विश्वासाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “भारतीय जनता पक्ष शब्द पाळणारा पक्ष आहे. आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहोत आणि तसेच राहणार आहोत.” राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. “20-21 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होईल. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. बियाण्यांची व्यवस्था करू आणि शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडू देणार नाही,” असे त्यांनी सांगितले. आश्रमशाळेतील अन्न विषबाधेची चौकशी सुरू शहादा तालुक्यातील आश्रमशाळेत झालेल्या अन्न विषबाधेच्या घटनेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, 11 जुलै रोजी 157 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. या प्रकरणी भोजन पुरवठादार आणि स्वयंपाकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे कौतुक अन्न भेसळविरोधातील मोहिमेबाबत हसन मुश्रीफ यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे विशेष कौतुक केले. “तुकाराम मुंढे यांना मी स्वतः सूचना दिल्या आहेत की, लोकांच्या आरोग्याशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करावे. त्यांनी अत्यंत धाडसी आणि प्रामाणिकपणे काम केले आहे,” असे ते म्हणाले. मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यातून मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात सुमारे 25 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे गोकुळसारख्या दूध संघांकडे मागणी वाढली आहे. “दुधात, पनीरमध्ये आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “धुळे येथील काही नागरिक भेटले होते. त्यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी कायम राहिले तर लोकांचे आयुष्य पाच-दहा वर्षांनी वाढेल. सर्व अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने प्रामाणिकपणे काम केले तर जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ मोठ्या प्रमाणात रोखता येईल.” हेही वाचा… ‘निवडणुकीत आश्वासनांची खैरात, नंतर तिजोरी रिकामी!:मोफत साडी योजना बंद केल्यावरून वडेट्टीवार आणि रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांना मिळणारी ‘मोफत साडी वितरण योजना’ आर्थिक टंचाईचे कारण देत गुंडाळली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी ‘जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत’:राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *