![]()
सेनगाव तालुक्यातील हत्ता शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 17 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी दिले आहेत.त्यासाठी पोलिसांची पथके स्थापन केली असून स्थानिक गुन्हे शाखेचेही पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाकडून दररोज वाळू घाटांच्या मार्गावर पाहणी केली जात आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील हत्ता शिवारात दोन टिप्परमधे अवैध उपसा केलेली वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार परसराम नागरे, सुभाष चव्हाण, पवन चाटसे यांच्या पथकाने गुरुवारी ता. 16 रात्री वाहनांची तपासणी केली. यामध्ये हत्ता येथे दोन टिप्पर आढळून आले. पोलिसांनी चालकाकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. शिवाय त्यांच्याकडे वाळू वाहतूकीच्या पावत्याही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे सदर वाळू अवैध उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी दोन टिप्पर व वाळू असा 24.22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार नागरे यांच्या तक्रारीवरून सत्यम राठोड (रा. भंडारी तांडा), गजानन विटकरे (रा. सेनगाव), कृष्णा राठोड (रा. लिंगदरी), युवराज देशमुख (रा. सेनगाव) यांच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार चाटसे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत वाळू तस्करांना दणका:24.22 लाखांच्या मुद्देमालासह दोन टिप्पर जप्त, चौघांवर गुन्हा दाखल