![]()
“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीस डीवायएसपी कुणाल सोनवणे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, उत्पादन शुल्क अधिकारी ऋषिकेश इंगळे, सावखेडकर, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व किशोर पवार उपस्थित होते. प्रांताधिकारी उंडे यांनी बैठकीत प्रत्येक दारूग्रस्त गावाचा आढावा घेतला. परमिट रूममधूनच अवैध दारूचा पुरवठा होत असल्याकडे लक्ष वेधत, त्यांनी अशा दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या दारू माफियांना तालुक्यातून तडीपार करण्याची घोषणा त्यांनी केली. दारूबंदी शासकीय समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी संगमनेरातून दररोज अवैध दारूच्या गाड्या अकोल्यात येत असल्याचा आरोप केला. यावर उंडे व सोनवणे यांनी बजावले की, “पोलीस पाटील गावचे रक्षक आहेत. दारूविक्री न थांबल्यास विक्रेत्यासोबत पोलीस पाटलांवरही कारवाई होईल.” रिक्त पदांच्या प्रश्नावर निर्णय घेणार पत्रकार मच्छिंद्र देशमुख यांनी दारूबंदी कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत राज्यस्तरावर आवाज उठवण्याची गरज मांडली. तहसीलदार मोरे यांनी गावकरी आणि प्रशासनाने मिळून हे धंदे कायमचे गाडण्याचे आवाहन केले, तर सरपंचांना ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्यास सांगितले गेले. पोलीस पाटलांनी मांडलेल्या रिक्त पदांच्या प्रश्नावर प्रांताधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
Source link
अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार