![]()
प्रतिनिधी | जामखेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जामखेड तालुक्याला लाभला आहे. अशा महान भूमीत सामाजिक व राजकीय कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्यातून मिळते, हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते जगभरात गौरवाने ओळखले जाते. त्यांनी पाणवठे, पाणीसाठे, धर्मशाळा, उद्योग-व्यापार आणि अन्नछत्रांच्या माध्यमातून समाजकल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्याच प्रेरणेने जामखेड नगर परिषद विकासाभिमुख कार्य करत राहील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त जामखेड नगर परिषदेच्या वतीने खर्डा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात तसेच मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी चौंडी येथील मुख्य शासकीय सोहळ्याचा उल्लेख करत सांगितले की, शासन अहिल्यादेवींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या सोहळ्यासाठी नगरसेविका वैशाली म्हेत्रे, सीमा कुलकर्णी, नगरसेवक तात्याराम पोकळे, प्रविण चोरडिया, श्रीराम डोके, विकी घायतडक, अशोक शेळके, प्रविण होळकर, अमित जाधव, अनिल बाबर, मोहन गडदे, कैलास हजारे उपस्थित होते.
Source link
अहिल्यादेवींचे कार्य जगभरात गौरवास्पद – प्रांजल चिंतामणी:जामखेड नगर परिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन