Headlines

आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलचे वर्चस्व:आर्मी पब्लिक स्कूलचीही दमदार कामगिरी, नगरकरांचा प्रतिसाद‎




फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचे सामने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने अनेक गटांत दमदार कामगिरी करत एकहाती वर्चस्व गाजवले तर आर्मी पब्लिक स्कूलनेही प्रभावी खेळाच्या जोरावर महत्त्वपूर्ण विजय मिळवले. सकाळच्या सत्रात १६ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने २-० गोलने विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूलकडून सिद्धी पोटे हिने ३३ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भावना हिने आणखी एक गोल करत संघाचा विजय निश्‍चित केला. यानंतर प्रवरा पब्लिक स्कूल आणि आठरे पाटील स्कूल यांच्यातील १६ वर्षांखालील मुलींचा सामना चुरशीचा झाला. प्रवरा पब्लिक स्कूलच्या दामिनी जाधव हिने २१ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर संघाने उत्कृष्ट बचावात्मक खेळ करत आठरे पाटील स्कूलला एकही गोल करण्याची संधी दिली नाही आणि प्रवरा पब्लिक स्कूलने १-० गोलने विजय मिळवला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने ऊर्जा गुरुकुलवर ७-० गोलने दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला धीरज चारस्कर आणि पाचव्या मिनिटाला युवराज आहेर यांनी सलग गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ८, १७ आणि २७ व्या मिनिटाला वैभव कविटकर याने सलग तीन गोल करत हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. दहाव्या मिनिटाला रणविजय जामकर आणि ४० व्या मिनिटाला मयूर पिंपळे यांनीही गोलांची भर घालत प्रवराचा एकतर्फी विजय निश्‍चित केला. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि ओएसिस स्कूल यांच्यात रंगतदार सामना झाला. प्रवराकडून वरद चौहान याने चौथ्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र १९ व्या मिनिटाला ओएसिस स्कूलच्या आर्यन पंडित याने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर प्रवराने पुन्हा आक्रमक खेळ करत सामन्यातील २७ व्या मिनिटाला श्रेयश डोईफोडे आणि सामन्यातील ४२ व्या मिनिटाला कुनाल कानडे यांनी गोल करत संघाला ३-१ गोलने दणदणीत विजय मिळवून दिला. रामचंद्र पालवे, वैभव कविटकरची हॅटट्रिक दुपारच्या सत्रात १६ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने ओएसिस स्कूलवर ७-० गोलने सहज विजय मिळवला. चौथ्या मिनिटाला अभिनव राऊत याने गोल करत सुरुवात केली. त्यानंतर ११, १२ आणि १७ व्या मिनिटाला रामचंद्र पालवे याने सलग तीन गोल झळकावत हॅट्‌ट्रिक नोंदवली. २८ आणि ४५ व्या मिनिटाला निखील वायभट याने दोन गोल केले, तर ३५ व्या मिनिटाला प्रविण काळे याने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *