![]()
शहरातील प्रमुख मार्गांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीकडे अखेर अकोट नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिले आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत २ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची तात्पुरती कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ठिगळ लावून करण्यात आलेली ही मलमपट्टी किती दिवस टिकणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनू चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, तसेच अकोट नगर परिषद प्रवेशद्वाराजवळील परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत होती. रहदारीच्या प्रमुख मार्गावरच रस्त्याची दूरवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. यासंदर्भात ‘दैनिक दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करत संबंधित ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये सिमेंटचा वापर करून तात्पुरती दुरुस्ती केल्याचे दिसून येत आहे. मात्र, डांबरी रस्त्यावर करण्यात आलेली ही सिमेंटची ठिगळ किती दिवस टिकणार? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, वाहनांची सततची वर्दळ व रस्त्यावर पडणाऱ्या ताणामुळे ही तात्पुरती दुरुस्ती पुन्हा उखडण्याची शक्यता आहे. खड्डे बुजवण्याची तात्पुरती कार्यवाही झाल्याने प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी कायमस्वरूपी व दर्जेदार रस्ते दुरुस्तीची मागणी कायम आहे.खड्डे बुजले, परंतु हे सिमेंटचे ठिगळ किती दिवस तग धरणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने खड्डे कायमस्वरुपी बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते विशाल भगत यांनी मागणी केली आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्न प्रमुख रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने रस्ते बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. दुरुस्तीचे काम केल्यानंतर त्याची गुणवत्ता व टिकाऊपणा याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा दर काही महिन्यांनी खड्डे बुजवणे आणि पुन्हा रस्ते खराब होणे, हे चक्र सुरूच राहण्याची शक्यता आहे.
Source link
डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ‘ठिगळ’; पालिकेची तात्पुरती मलमपट्टी:रस्त्यांची तांत्रिक पाहणी करून दर्जेदार कामांची मागणी