Headlines

आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्य नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा:अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎




प्रतिनिधी | अकोला आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे मराठा समाजात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. वगळलेला नकाशा पूर्ववत समाविष्ट करा, अशी मागणी करीत अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक दिली. यापूर्वी अनेकदा इतिहास बदलण्यात येत असल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झाले होते. कधी जाहीर भाषण तर कधी लिखाणातून इतिहासाचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान आता इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पूर्वी समाविष्ट असलेला मराठा समाजाचा नकाशा अलीकडील आवृत्यामध्ये वगळण्यात आलेला आहे, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि केंद्रीय कार्यकारिणीचे आदेशान्वये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून तो नकाशा इतिहासाच्या पुस्तकात पूर्ववत समाविष्ट करून राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्रात दाखवावा, अशी मागणी होत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मागणीचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, विभागीय महिला अध्यक्ष कल्पना बिडवे, जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, सिंधू पवार, राजेश पाटील, राखी पटेकर, मीना लांडे, योगेश थोरात, अरुण खोटरे, विठ्ठलराव वाघ, माधुरी वाघमारे, श्रीकांत सरोदे, प्रदीप लुगडे, शंतनू वस्तू, विपुल माने, शाम देशमुख, अजिंक काळे, रोहित बारस्कर, नितीन पाटील, अंकीत कदम, विक्रांत वाघमारे, नरेश सूर्यवंशी, उमेश साबळे आदींच्या सह्या असल्याचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी कळवले आहे. नकाशा पुन्हा समाविष्ट करून त्यामध्ये राजपुताना (राजस्थान) हा मराठा साम्राज्याचा प्रभाव क्षेत्रात दाखवावा. या संदर्भात ऐतिहासिक पुरावे सुध्दा निदर्शनास आणून दिले आहेत. मराठा-मारवाड संबंध (१७२४-१८४३) या ग्रंथांमध्ये राजस्थान हिंदी ग्रंथ अकादमी जयपूर यांनी प्रकाशित केलेल्या दस्तऐवजांमध्ये मराठा आणि राजपूत राज्यांमधील संबंध स्पष्टपणे नोंदलेले आहे. या पत्रांमध्ये मराठा सरदारांकडे मदत संरक्षण व सैन्य पाठवण्याच्या विनंत्या करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित पत्रव्यवहारामध्ये विविध राजपूत शासकांनी मराठा सरदारांना (उदा . विसाजी पंत बिनीवाले) थेट विनंती करून सैन्य मदत मागितल्याचे उल्लेख आहे. यावरून त्या प्रदेशावर मराठ्यांचा प्रभाव व राजकीय वर्चस्व होते,हे सिद्ध होते, असे महासंघाचे म्हणणे आहे. सन १७५२ च्या करारानंतर मुघल बादशहा मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेला होता. परिणामी मुघलांचे मंडलिक असलेले अनेक राजपूत शासन अप्रत्यक्षपणे मराठा सत्तेखाली आले होते, असा इतिहासकारांचा सर्वमान्य निष्कर्ष आहे. विविध ऐतिहासिक कागदपत्रानुसार मराठ्यांनी राजस्थानातील प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. ही बाब त्यांच्या प्रभावी राजकीय अधिकाराचे द्योतक आह, असेही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाचा नकाशा हा केवळ भौगोलिक सीमांचा नसून प्रभावक्षेत्र दर्शवणारा आहे. त्यामुळे राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्रात दाखवणे हे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य व आवश्यक आहे. मराठा साम्राज्याच्या नकाशा पुन्हा पाठ्य पुस्तकात समाविष्ट करावा. संबंधित नकाशामध्ये राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्र म्हणून दाखवावा. या संदर्भात इतिहास तज्ञांची समिती नेमून योग्य शास्त्रीय पडताळणी करून निर्णय घ्यावा. शासनाने निवेदनाचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ व पुराव्याधारित इतिहास उपलब्ध करून द्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *