![]()
^आजचा तरुण हा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून नवीन संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी जिद्द, धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तरुणांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य, न्यू आर्टस महाविद्यालय, पारनेर. प्रतिनिधी | पारनेर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘नोकरी देणारे’ व्हा, हा मंत्र आता पारनेरचे तरुण आत्मसात करत आहेत. येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात बीबीए विभागाच्या वतीने आयोजित ‘उद्योजकता विकास’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची उत्साहात सांगता झाली. एक महिना चाललेल्या या मंथनातून तालुक्याला भविष्यातील उद्योजक मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्ये जागी करण्यासाठी या विशेष कोर्सची आखणी करण्यात आली होती. ३० दिवसांच्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाची खऱ्या अर्थाने ओळख करून देण्यात आली. यात व्यवसायाची संकल्पना कशी सुचवावी आणि ती कशी विकसित करावी?, बाजारपेठेचा अभ्यास करून ग्राहकांची नाडी कशी ओळखावी?, व्यवसायासाठी आर्थिक नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन कसे करावे?, प्रभावी संवादकौशल्ये, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांचा विकास हे विद्यार्थी शिकले. बीबीए विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गुलगे यांच्या नेतृत्वाखाली या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला होता. प्रा. मनीष पागिरे आणि प्रा. ऋतुजा गोरे यांनी महिनाभर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष व्यवसायातील बारकावे शिकवले. उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे आणि समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभात विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष व्यावसायिक आराखडा तयार केल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून आला. येणाऱ्या काळात हेच विद्यार्थी पारनेरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवे चेहरे म्हणून समोर येतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली. व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
Source link
पारनेरच्या विद्यार्थ्यांकडे आता व्यवसायाची "मास्टर की''!:न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात उद्योजकता शिबिराची यशस्वी सांगता