![]()
सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्या तत्परतेमुळे हिंगोली येथील बसस्थानकावर आल्यानंतर गोंधळून गेलेल्या विदर्भातील व्यक्तीच्या कुटुंबाची अवघ्या एका तासात माहिती मिळाली असून त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने हिंगोली येथे धाव घेत मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पाहून सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विदर्भातील उमरखेड जवळील पिंपळदरी येथील माधव बालाजी रिठ्ठे (६५) हे गावातील सात ते आठ जणांसोबत सुमारे १० दिवसांपुर्वी देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर पंढरपूर येथे माधव यांची गावातील मंडळींसोबत चुकामुक झाली. दोघांनी एकमेकांचा शोध घेतला. मात्र माधव हे गावी गेले असावे असे गृहीत धरून त्यांच्या सोबत असलेली मंडळी गावी निघून गेली. मात्र इकडे माधव हे पूर्णपणे गोंधळून गेले. तब्बल आठ दिवस ते पंढरपूर येथे थांबले. त्यांना गावाचा पूर्ण पत्ताही सांगता येत नव्हता. त्यानंतर पंढरपूर येथे एका व्यक्तीने त्यांना हिंगोलीच्या बसमध्ये बसवून दिले. दरम्यान, माधव हे आज सकाळी हिंगोलीच्या बसस्थानकावर आले त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती. यावेळी काही नागरीकांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांव रिठ्ठे असून पिंपळदरी येथील असल्याचे सांगितले. त्यावरून नागरीकांनी पिंपळदरी (ता.औंढा) येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावरून घोंगडे यांनी गावात माहिती घेतली असता माधव रिठ्ठे हे औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील नसल्याचे स्पष्ट झाले. यावेळी घोंगडे यांनी एका रिक्षा चालकाशी संपर्क साधून माधव यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. या प्रकारानंतर घोंगडे यांनी तातडीने सोशल मिडीयावर माहिती देऊन त्यांचे छायाचित्र अपलोड केले. मराठवाडा व विदर्भातील त्यांच्या ग्रूपवर माहिती टाकल्यानंतर अवघ्या एका तासाच माधव यांच्या कुटुंबियांची माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबियांनी घोंगडे यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. माधव रिठ्ठे हे विदर्भातील पिंपळदरीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर माधव यांची दोन्ही मुले हिंगोलीत आली. त्यांनी वडिलांना सुखरूप पाहिल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला.
Source link
आठ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाची सोशल मिडीयामुळे तासात मिळाली माहिती:सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांची तत्परता