![]()
प्रतिनिधी | नेवासे वारकरी संप्रदायातील सेवाभाव, दानशूरता आणि संतसेवेची देदीप्यमान परंपरा जपत श्री जगद्गुरु तुकोबाराय निजधाम सेवा संस्था (पंढरपूर) यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (नेवासा) यांना पाच लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे. ही रक्कम धनादेशाद्वारे संस्थानचे प्रमुख विश्वस्त देविदास महाराज मस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अलीकडेच सप्ताह सोहळा झाला होता. या सोहळ्यानंतर उर्वरित राहिलेली सुमारे ७५ लाख रुपयांची मोठी रक्कम विविध धार्मिक, शैक्षणिक व वारकरी संस्थांच्या कार्यासाठी देण्याचा स्तुत्य निर्णय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी घेतला. त्यानुसार पंढरपूर देवस्थान, आळंदी येथील माऊली संस्थान, वारकरी शिक्षण संस्था यांसह इतर प्रमुख देवस्थानांना आर्थिक मदत करण्यात आली. याच दातृत्वातून नेवासे येथील पावन ज्ञानेश्वर महाराज संस्थानलाही ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. संतभूमी उपासना पारायण सोहळा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, विष्णुपंत ठोसर व संस्थेच्या प्रतिनिधींच्या हस्ते हा धनादेश नेवासा संस्थानकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी वेदांताचार्य देविदास महाराज मस्के, कैलासराव जाधव, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामभाऊ मामा जगताप, नंदकिशोर महाराज खरात, गणेश महाराज आरगडे, बदामराव पठाडे, सोनू पांगरे आणि सेवेकरी शिवाजीराव होन यांच्यासह अनेक वारकरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. देणगी स्वीकारल्यानंतर नेवासा संस्थानच्या वतीने छोटे माऊली यांच्याप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. संतसेवा आणि समाजसेवेचा हा संगम वारकरी परंपरेतील लोककल्याणाच्या भावनेचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Source link
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानला ५ लाख रुपयांची देणगी:वारकरी सेवाभावाचा आदर्श