![]()
पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, रखडलेले मेट्रो काम, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. हिंजवडीतील समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास चाकणप्रमाणेच मोठ्या कंपन्याही इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंजवडी आणि परिसरातील मूलभूत प्रश्नांचा पाढा वाचला आहे. त्याआधी हिंजवडीला भेट देऊन आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच स्थानिक रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचे आवाहन केले. हिंजवडीत 6 लाख आयटी कर्मचारी, तरी मूलभूत सुविधांचा अभाव आदित्य ठाकरे यांनी पत्रात हिंजवडी परिसराचे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात सुमारे सहा लाख लोक थेट आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत, तर पूरक उद्योगांमध्ये याच्या जवळपास तिप्पट लोकांना रोजगार मिळतो. फॉर्च्यून 500 कंपन्यांमधील काही मोठ्या कंपन्यांचेही या परिसरात अस्तित्व आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक उलाढाल असलेल्या परिसरात मात्र नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत हिंजवडी फेज-१ मधून फेज-३ मध्ये जाण्यासाठी किमान दीड तास लागतो, असा मुद्दा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. 2025 मध्ये आश्वासन दिले, मात्र ठोस हालचाल नाही हिंजवडीतील नागरिकांनी यापूर्वीही आपल्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२५ मध्ये या प्रश्नांवर कारवाईचे आश्वासन दिले होते, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही अपेक्षित ठोस हालचाल झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च पातळीवरून या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. एकच यंत्रणा निश्चित करा हिंजवडीतील समस्यांसाठी विविध सरकारी आणि स्थानिक यंत्रणांकडे जबाबदारी असल्यामुळे समन्वयाचा अभाव निर्माण होत असल्याचा मुद्दा ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एकच यंत्रणा निश्चित करून तिची जबाबदारी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित यंत्रणेचे सार्वजनिकपणे ऑडिट आणि नियमित पुनरावलोकन करण्याची व्यवस्थाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी हिंजवडीतील वाहतूक कोंडी हा दररोजच्या जीवनाचा मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांवर अधिक वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वाहतूक व्यवस्थेतील तातडीच्या उपाययोजनांसोबतच परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ‘मेट्रोचे उद्घाटन नंतर करा, आधी सेवा सुरू करा’ हिंजवडी परिसरातील मेट्रो प्रकल्पावरूनही ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मेट्रोचा काही भाग तयार झाला असतानाही सेवा सुरू होण्यास विलंब होत असल्याबद्दल स्थानिक रहिवासी नाराज असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ‘मेट्रो तातडीने सुरू करावी, उद्घाटन नंतरही करता येईल,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. याशिवाय मेट्रोच्या कामामुळे आणि तिच्या खालील भागातील रस्त्यांची अवस्था आणखी खराब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प आणि रस्ते या दोन्ही प्रश्नांकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले आहे. पाणी आणि पाइपद्वारे गॅसची मागणी हिंजवडीसारख्या मोठ्या आयटी केंद्रात राहणाऱ्या नागरिकांना अजूनही पाईपद्वारे पाणीपुरवठा आणि पाईपद्वारे गॅससारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हिंजवडीतील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. व्हीआयपी दौरा असताना कचरा व्यवस्थापन व्यवस्थित केले जाते; मात्र सामान्य दिवसांमध्ये परिस्थिती वेगळी असते, असा आरोप त्यांनी केला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबतही जबाबदारी निश्चित करून संबंधित यंत्रणेचे ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. चाकणप्रमाणे हिंजवडीतील कंपन्याही स्थलांतरित होऊ शकतात आपल्या पत्रातील सर्वात महत्त्वाचा इशारा देताना आदित्य ठाकरे यांनी चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतराचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या ट्विटनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजार २११ उद्योग बंद झाले किंवा राज्याबाहेर गेले, असा दावा त्यांनी केला आहे. पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार यामुळे चाकणमधील २० उद्योगांनी तेथून बाहेर पडण्याची घोषणा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चाकणला भेट दिल्यानंतर उद्योगमंत्र्यांना तेथे जाऊन सुमारे पाच तास घालवावे लागले आणि अनेक घोषणा करण्यात आल्या. या घोषणांची अंमलबजावणी झाली की नाही, हे तपासण्यासाठी आपण पुढील महिन्यात पुन्हा चाकणला भेट देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर हिंजवडीतील प्रश्नही वेळीच सोडवले नाहीत, तर मोठ्या कंपन्या सरकारकडून चांगल्या सेवा मिळत नसल्याने इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. 6 सप्टेंबरला आंदोलन; आदित्य ठाकरेंचा पाठिंबा हिंजवडीतील समस्यांविरोधात स्थानिक रहिवाशांनी ६ सप्टेंबर रोजी आंदोलनाचे नियोजन केले आहे. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे हिंजवडीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न आता केवळ स्थानिक नागरिकांचा प्रश्न न राहता राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय बनण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी आदित्य ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मागण्या पाहता हिंजवडीसाठी वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, मेट्रो सुरू करणे, पाणीपुरवठा, गॅस सुविधा आणि कचरा व्यवस्थापन या सहा प्रमुख मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा… आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाची कवडीचीही किंमत नाही का?: गडचिरोलीतील 3 बळींनंतर पळसन आश्रमशाळेच्या दुरवस्थेवरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेचा एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे. “निष्पाप विद्यार्थिनींचे बळी जाऊनही हे निर्दयी सरकार आणि ढिम्म प्रशासन जागे झालेले नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना पत्र:कंपन्या स्थलांतरित होण्याचा धोका; हिंजवडीतील वाहतूक, रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा