Headlines

बाप्पाच्या उंचीचा अडथळा दूर!:गणेशोत्सवातील 6 फुटांवरील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला हायकोर्टाचा 'ग्रीन सिग्नल'; मंडळांना दिलासा




दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांच्या गळ्यात एकच घोर असतो— “यंदा पीओपी (Plaster of Paris) मूर्तींवर बंदी येणार का? मोठ्या मूर्तींचं काय होणार?” यंदा मात्र उत्सवाचे ढोल वाजण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने या चिंतेला पूर्णविराम दिला आहे. एका महत्त्वपूर्ण आणि तात्पुरत्या दिलाशामुळे यंदाही 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन थेट समुद्र, नद्या किंवा तलावांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येणार आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नेमकं कोर्टाने काय म्हटलंय? उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी (24 जुलै 2025 रोजी) जो अंतरिम (तात्पुरता) आदेश दिला होता, तोच आदेश यंदाही कायम ठेवला आहे. या प्रकरणावर न्यायालयाचा अंतिम आणि ठोस निकाल येत नाही, तोपर्यंत हीच व्यवस्था लागू राहील. कोर्टाच्या या भूमिकेमुळे विसर्जनाच्या नियमांचा संभ्रम आता पूर्णपणे मिटला आहे. या नियमावलीनुसार विसर्जनाचे दोन भाग करण्यात आले आहेत तांत्रिक अडचण लक्षात घेतली! गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाकडून पीओपी मूर्तींवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या अवजड आणि भव्य मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय होते. पाण्याचा दाब, तलावांची खोली आणि मूर्तीची सुरक्षितता यांमुळे सार्वजनिक मंडळांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. हायकोर्टाने हीच तांत्रिक बाजू समजून घेत मंडळांना दिलासा दिला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली कोर्टाच्या या निर्णयानंतर केवळ गणेशभक्तच नाही तर पालिकेचे अधिकारीही सुखावले आहेत. आता नियमांचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाला केंद्रस्थानी ठेवून विसर्जनाच्या घाट आणि कृत्रिम तलावांचे नियोजन सुरू केले आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत हाच ‘फॉर्म्युला’ लागू राहणार असल्यामुळे, यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही तांत्रिक कटकटींशिवाय आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा तब्बल ‘3 शुभ योगांचा’ महासंयोग लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपत आली असून, यंदाचा गणेशोत्सव भाविकांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, यंदा गणेश चतुर्थीला तब्बल तीन अद्भुत ग्रहांचे शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया मूर्ती स्थापना, पूजेचा शुभ मुहूर्त आणि विसर्जन तिथीची संपूर्ण माहिती. 14 सप्टेंबरला होणार ‘बाप्पा’चे आगमन! वैदिक पंचांगानुसार, यंदा भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7:44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार चंद्रोदयाची वेळ 14 सप्टेंबरला मिळत असल्याने, संपूर्ण देशभरात सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त (दुपारी 1:31 पर्यंत वेळ) यंदा गणेश स्थापनेसाठी भाविकांना सुमारे अडीच तासांचा अतिशय उत्तम काळ मिळणार आहे. या वेळेत गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणे शास्त्रानुसार अत्यंत फलदायी ठरेल. रवी, ब्रह्म आणि इंद्र योगाचा त्रिवेणी संगम! यंदाच्या गणेश चतुर्थीचे मुख्य आकर्षण म्हणजे या दिवशी निर्माण होणारे 3 शुभ योग आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या योगांमध्ये केलेली पूजा-अर्चा सुख-समृद्धी वाढवणारी ठरते. 25 सप्टेंबरला होणार ‘अनंत चतुर्दशी’ (गणेश विसर्जन) 10 दिवस भक्तांच्या आदरातिथ्याचा स्वीकार केल्यानंतर, बाप्पाला निरोप देण्याचा भावुक क्षण म्हणजेच अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर रोजी असेल. पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी 24 सप्टेंबर रोजी रात्री 11:18 वाजता सुरू होईल आणि 25 सप्टेंबर रोजी रात्री 11:06 वाजता संपेल. त्यामुळे उदयतिथीच्या नियमानुसार, शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी लाडक्या विग्रहांचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होईल. ‘दिव्य मराठी’चे विशेष अभियान गणेशोत्सवाचा महान वारसा जगाला देणाऱ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवात गणेशाची देखणी मूर्ती हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर विहिरी, तलाव आणि इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नसल्याने बाप्पाच्या मूर्तींची विटंबनाही होते. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन ‘दैनिक दिव्य मराठी’च्या वतीने ‘मातीचे गणेश, घरातच विसर्जन’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचेही आवाहन दिव्य मराठीच्या या स्तुत्य उपक्रमाचे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी मनापासून कौतुक केले आहे. देशभरातील आणि राज्यातील नागरिकांना मातीचेच गणपती बसवण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. दिव्य मराठीच्या या मोहिमेला पाठिंबा देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “पर्यावरण मंत्री म्हणून मी दरवर्षी पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे आवाहन करते. केवळ आवाहनच नाही तर प्रशासकीय पातळीवर विविध विभागांच्या माध्यमातून आम्ही यासाठी नेहमीच विशेष मेहनत घेत असतो. मात्र, या कार्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. दैनिक भास्कर ग्रुपच्या ‘दिव्य मराठी’ वर्तमानपत्राने सुरू केलेला हा प्रयोग अत्यंत कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. मी दिव्य मराठीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आणि त्यांचे अभिनंदन करते.” केमिकलमुक्त आणि मातीच्या मूर्तींना द्या प्रोत्साहन पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. आगामी गणेशोत्सवात सर्वांनी मातीचेच गणपती बनवावेत किंवा खरेदी करावेत. तसेच जे कारागीर अशा पर्यावरण पूरक मूर्ती बनवतात, त्यांना आपण सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक रंगांचा (केमिकल युक्त कलर) वापर नसलेले गणपती घरात आणावेत आणि त्यांचे विसर्जनही पर्यावरण पूरक पद्धतीनेच व्हावे, जेणेकरून आपल्या जलस्रोतांचे नुकसान होणार नाही.” ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेले ‘मातीचे गणेश, घरातच विसर्जन’ हे अभियान घराघरांत पोहोचणे गरजेचे असून, नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन निसर्गाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *