Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह:हिमोग्लोबीन तपासणीसाठी किटच उपलब्ध नाही, आरोग्य विभागाकडे तोंडी मागणी




आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनांनंतर हिंगोली जिल्ह्यातील पाच आदिवासी आश्रमशाळांमध्ये आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली हिमोग्लोबीन तपासणी करण्यासाठी आवश्यक किटच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे रक्त कमी असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख कशी करायची आणि त्यांना आवश्यक औषधोपचार कधी सुरू करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी विकास विभागाने राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी, गोटेवाडी, शिरडशहापूर, जामगव्हाण आणि बोथी येथील आश्रमशाळांमधील सुमारे 1,900 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नियुक्त डॉक्टरांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू आहे. मात्र या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे की नाही, हे तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या हिमोग्लोबीन किटचा अभाव असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य तपासणी सुरू असली तरी हिमोग्लोबीन तपासणीअभावी विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण निश्चित करणे अडचणीचे ठरत आहे. हिमोग्लोबीन तपासणीसाठी किट उपलब्ध नसल्याने सध्या रक्ताची कमतरता असल्याचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र प्रत्यक्ष तपासणीशिवाय विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता किती आहे, याचे अचूक निदान कसे होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हिमोग्लोबीन किट उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे तोंडी मागणी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी आदिवासी विभागाकडून हिमोग्लोबीन किटची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र किती किट आवश्यक आहेत, याची संख्या अद्याप विभागाकडून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. आवश्यक संख्येची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार किट उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी सुनील बारसे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सहाय्यक प्रकल्प अधिकारी राम भोसले यांनी आरोग्य तपासणी सुरू असल्याचे सांगून हिमोग्लोबीन किटबाबत माहिती घेऊन सांगतो, असे स्पष्ट केले. संशयित विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणार ज्या विद्यार्थ्यांमध्ये रक्ताची कमतरता असल्याचा संशय आहे, अशा विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यासाठी गरज भासल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच प्रत्येक आश्रमशाळेला आवश्यक असलेल्या हिमोग्लोबीन किटची संख्या सादर करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आयर्नच्या तीन हजार बाटल्यांचा पुरवठा दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी आयर्नच्या औषधांच्या सुमारे तीन हजार बाटल्यांचा पुरवठा आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे. शाळास्तरावर नियुक्त परिचारिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे औषध देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र एकीकडे आयर्नच्या औषधांचा पुरवठा झाला असताना दुसरीकडे हिमोग्लोबीन तपासणीसाठी आवश्यक किट उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी किती प्रभावीपणे सुरू आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किट कधी उपलब्ध होणार आणि सर्व 1,900 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन तपासणी प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे आता पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *