Headlines

आधी तुमचे फॅन-कुलर बंद करा, मग कळेल…:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, हॉस्टेलमधल्या मुलींची अडचण तात्काळ सोडवली




शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील वसतिगृहातील मुलींच्या प्रश्नावर मात्र चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील तापमान 45 अंशांवर पोहोचलेले असताना वसतिगृहातील मुलींनी कूलर्सची मागणी केली होती, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे दिली. हा गंभीर प्रकार समजताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूत्रे हलवत प्रशासनाला धारेवर धरले आणि अवघ्या काही तासांतच हा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थिनींना मोठा दिलासा दिला. नागपूरच्या बेसा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ही स्थिती विदर्भातील कडक उन्हाळ्याचे भीषण वास्तव मांडणारी आहे. बाहेर तापमान 40 ते 45 अंशांच्या घरात असताना वसतिगृहाच्या खोल्यांचे रूपांतर अक्षरशः भट्टीत झाले होते, ज्यामुळे तिथे राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घरापासून दूर आलेल्या या मुलींसमोर सध्या या अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याचे मोठे संकट उभे ठाकले होते. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यामुळे विद्यार्थिनींची रात्रभर झोप उडाली होती, तर काहींना उष्णतेमुळे त्वचेचे विकारही जडले होते. मात्र वारंवार विनंती करूनही प्रशासन तांत्रिक अडचणींचे पालुपद लावून या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. अखेर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा गंभीर विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आणि वस्तुस्थिती समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला, ज्यामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. आतापर्यंत कुलर का लावले नाहीत? “आतापर्यंत कुलर का लावले नाहीत? आधी तुमच्या कार्यालयातील फॅन आणि कुलर बंद करा, मग कळेल त्या मुलींना काय सोसावे लागत आहे,” अशा कडक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना फटकारताच प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या एका संतप्त फोन कॉलमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक अडचणी अवघ्या काही तासांत निकाली निघाल्या आणि बेसा येथील शासकीय वसतिगृहात तातडीने कुलर दाखल झाले. राज्यातील सर्वच वसतिगृहांमध्ये कुलर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच शासकीय वसतिगृहांमध्ये कुलर बसवण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थिनींना कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला असून, आपल्या लाडक्या ‘देवा’भाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी पत्रांद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीतून त्यांचे आभार मानले. एका संवेदनशील लोकप्रतिनिधीने तातडीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *