![]()
शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात दरवर्षी अत्यंत वाजत-गाजत हर्षोल्लासात होणारी ‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा त्याच जोशात साजरी केली जाणार आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. कोरोना काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे हे आयोजन थांबले होते. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव राजेंद्र वर्मा व उपाध्यक्ष माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी संयुक्तरित्या केलेल्या निवेदनानुसार आगामी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर, ५ सप्टेंबर रोजी हे आयोजन होईल. दरवर्षीप्रमाणे सर्वपक्षीय पुढारी यावेळी उपस्थित राहणार असून यावर्षीच्या दहिहंडीची उंची ही ३० फूट ठेवली जाणार आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे सर्व गोविंदा पथकांना माहिती देण्यात आली असून त्यापैकी निवडक पथकांना या स्पर्धेत सहभागी करुन घेतले जाईल. दरम्यान दहिहंडीच्या बक्षीसांची रक्कम, गोविंदा पथकांच्या समावेशाची मर्यादा आणि त्यासाठीची नोंदणी आदी तपशील येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. जुन्या पिढीतील आनंददायी प्रसंग हुबेहूब नव्या पिढीसमोर उभे करण्याचा या संघटनेचा नेहमी मानस असतो. दहिहंडीचा उत्सव हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे तो अगदी गोपाळकाल्याच्या दिवशीच साजरा करण्यावर संघटनेचा कटाक्ष असतो. एकावर्षी तर चक्क स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी हे आयोजन साजरे केले गेले, याची आठवणही संघटनेचे उपाध्यक्ष बबनराव रडके यांनी करुन दिली. यावेळी द्वितीय सचिव महेश साहू, कोषाध्यक्ष विकास पाध्ये, कार्यालयीन सचिव राजेंद्र बाळापुरे, दीपक शर्मा, अतुल टाले, जनसंपर्क प्रमुख किशन जाधव, सल्लागार समितीचे सदस्य दिलीप मेहरे, बी.डी. उर्फ बाळासाहेब देशमुख, राजूभाऊ परिहार, अनिल मुणोत, सोमेश्वर सोनटक्के, तरुणभाई धुवाविया आदी उपस्थित होते. भुलाबाईंची गाणी, शहीदांचे स्मरणही जुन्या पिढीतील उत्कृष्ट व्रत-वैकल्ये आणि शूर-वीरांचे स्मरणही संघटनेतर्फे सामुहिकरित्या साजरे केले जातात. यामध्ये चैत्रारंभाच्या दिवशी उंच गुढीची उभारणी, कोजागीरी पौर्णीमा, भुलाबाईंची गाणी, इदमिलन, २६-११ च्या शहीदांचे स्मरण आदी उपक्रमांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवात अल्पदरात फराळ व पुरी-भाजीचे वितरणही राजकमल चौकात स्टॉल लाऊन नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे नित्य-नेमाने केले जाते.
Source link
‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा होणार:नवयुवक विद्यार्थी संघटनेची घोषणा, 30 फूट असेल दहिहंडीची उंची