Headlines

आपल्या काकीसाठी पुतण्या मैदानात!:सुनेत्रा पवारांच्या प्रचारात रोहित पवारांचाही सहभाग, कन्हेरी मंदिरात नारळ फोडून केला प्रारंभ




महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील झाला आहे. त्यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सर्व नेते उपस्थित होते. मात्र शरद पवार गटाचा कुठलाही नेता उपस्थित नसला, तरी आता आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू केल्याचे ट्विट करत सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, आदरणीय पवार साहेब, अजितदादा किंवा सुप्रियाताई या सर्वांच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच प्रारंभ झाला आहे. त्याच अनुषंगाने आज अजितदादांच्या जागी सुनेत्रा काकी या पोटनिवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याच मंदिरात श्री मारुतीरायाचे, श्री दत्त महाराज आणि महादेवाचे दर्शन घेतले. तसेच सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्या समाधीलाही अभिवादन केले, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सुनेत्रा पवार या अजित पवार गटाच्या तर रोहित पवार हे शरद पवार गटाचे नेते आहेत. असे असूनही त्यांनी कौटुंबिक नाते जपत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच रोहित पवार हे अजित पवारांच्या निधनाच्या तपासासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले आहेत. आता त्यांनी त्यांच्या काकी अर्थात सुनेत्रा पवार यांना प्रचारात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल प्रकरणी रोहित पवारांची प्रतिक्रिया तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्यात न्यायालयात शाब्दिक वाद झाले होते. या मुद्द्यावर देखील आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, सरकार किंवा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तेंव्हा प्रत्येकाची शेवटची आशा न्यायपालिका असते आणि न्यायपालिका कुठल्याही पूर्वग्रहशिवाय न्याय देईल ही सर्वसामान्य भावना असते. परंतु न्यायपालिका पूर्वग्रहाने काम करायला लागल्यास न्यायव्यवस्थेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास उडू शकतो. पुढे रोहित पवार म्हणाले की, दिल्ली उच्च न्यायालयात आपचे नेते अरविंद जी केजरीवाल यांच्या केससंदर्भात आलेला याच प्रकारचा विषय चिंताजनक आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात देखील अशाच प्रकारचा विषय आम्ही समोर आणला होता, परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. न्यायव्यवस्थेवर सर्वांचा ठाम विश्वास आहे, परंतु अनबायसनेस (unbiasness) हा या विश्वासाचा आधार आहे आणि हा आधारच डळमळीत असेल तर या विश्वासालाच तडा जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *