Headlines

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार




आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी घडू शकत नाही,असे प्रतिपादन डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले. ‘एज्युमीट अकॅडमी, महाराष्ट्र’ आयोजित ‘भारत टॅलेंट सर्च’ (बीटीएस) परीक्षेत जिल्हास्तरावर चमकलेल्या आणि प्रतिष्ठेच्या ‘इस्रो’ सहलीसाठी पात्र ठरलेल्या ३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व थेट बोर्डींग पास देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा केडगाव येथील ऊर्जा रंगभवन येथे झाला. व्यासपीठावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पीएसआय अंबादास हुलगे, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका संजना चेमटे-अडसूळ, शीतल झरेकर-आठरे, नारायण मंगलाराम, ज्योती बेलवले, विक्रम अडसूळ आणि ज्ञानदेव नवसरे आदी उपस्थित होते.डॉ. बहुरुपी म्हणाले, तुमचा मुलगा कितीही हुशार असला, पण जर त्याच्यात इतरांबद्दल सहानुभूती नसेल, तर त्या हुशारीला काही अर्थ नाही. पीएसआय अंबादास हुलगे म्हणाले, मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त ज्ञान मिळवण्यासाठीच करा. वेळेचे महत्त्व ओळखा, रोज थोडा वेळ व्यायाम करा आणि अवांतर पुस्तकांचे वाचन करा. आपल्या आई-वडील आणि गुरुजनांचा नेहमी आदर करा. आज तुमच्यात जे गुण दिसत आहेत, त्यावरून उद्याचे वैज्ञानिक, पोलिस अधिकारी, लष्करी अधिकारी, डॉक्टर्स तुमच्यातूनच घडणार आहेत. प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांनी, तर सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लाराम आणि राहुल आठरे यांनी केले. “या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे मुलांमध्ये भविष्यातील यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या अत्यंत कठीण परीक्षांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. या स्पर्धा परीक्षा पाठांतरावर आधारित नसून, त्या पूर्णपणे बुद्धिमत्ता, उपयोजन आणि तुम्ही कठीण प्रश्नांवर काय तोडगा काढता, यावर आधारित असतात. बीटीएसचा पॅटर्नही अगदी याच स्वरूपाचा आहे, असे दिनकर टेमकर म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *