![]()
राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशी तसेच इतर खरिपाच्या पिकांची लागवड उरकून घेतली होती. सुदैवाने, या रिमझिम पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र, पिके टिकवून ठेवण्यासाठी आता मुसळधार पावसाची नितांत गरज आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यातच पावसाने मोठी दडी मारल्याने विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे. पाऊस लांबल्यामुळे तालुक्यातील हक्काची बागायत शेती आता मोठ्या अडचणीत आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने या भागातील हुकमी मानल्या जाणाऱ्या उसाच्या लागवडी पूर्णपणे थंडावल्या आहेत, तर इतर पिके घेणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी सध्या त्यांच्यापासून फारकत घेतली आहे. शेतकऱ्यांचे डोळे वरुणावर; धरणाच्या पाण्यावरच भवितव्य राहुरी तालुक्याच्या काही भागातील शेती ही मुळा डावा कालवा, तर काही भागातील शेती उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण राहुरीच्या शेतीचे भवितव्य हे मुळा धरणाच्या साठ्यावर अवलंबून आहे. सध्या शेतकरी लाभक्षेत्रातील पावसाबरोबरच पाणलोट क्षेत्रातील पावसाचीही डोळे लावून प्रतीक्षा करत आहेत. लाभक्षेत्रातील पाऊस पिके उभी करण्यासाठी, तर पाणलोट क्षेत्रातील पाऊस धरण भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धरण भरल्याशिवाय नदीपात्रात पाणी वाहते होणार नाही, म्हणूनच वरुणराजाच्या कृपेसाठी राहुरीचा तहानलेला शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाणलोटात पाऊस, पण लाभक्षेत्र कोरडे सध्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी, लाभक्षेत्रात मात्र पावसाने अजूनही म्हणावी तशी बरसात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. तालुक्यातील नदीकाठच्या भागातील विहिरी, बोअरवेल तसेच इतर पाण्याच्या सुविधा केवळ मुळा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जोपर्यंत मुळा नदी वाहती होत नाही आणि पाऊस चांगला पडत नाही, तोपर्यंत शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणारा नाही.
Source link
वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा