Headlines

आरबीएसकेमुळे ८७९ बालकांना नवसंजीवनी:अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया




अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) प्रभावीपणे राबवला जात आहे. या योजनेतून आतापर्यंत ८७९ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय, ४५४७ इतर विविध शस्त्रक्रिया करून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक बालकांना यामुळे नवजीवन मिळाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. शासनाचा हा उपक्रम हजारो बालकांसाठी जीवनदायी ठरत आहे. ही योजना केवळ आरोग्य सेवा न राहता अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण बनली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले. दुर्गम आणि ग्रामीण भागातील बालकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात अमरावती जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. आरबीएसके अंतर्गत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया, हायड्रोसील, स्क्विंट (डोळ्यांचा तिरळेपणा), दंतरोग, फायमोसीस, हाडांचे आजार तसेच टॉन्सिल्स आदी विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक निलेश पुंनसे यांनी अमरावती जिल्ह्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त बालकांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तालुकास्तरावर कार्यरत पथकांमार्फत मोफत सेवा उपलब्ध करून दिली जात असून, ही सेवा भविष्यातही अविरत सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शस्त्रक्रियांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी), डॉ. पाटील कान-नाक-घसा हॉस्पीटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई, नेल्सन हॉस्पिटल नागपूर, किम्सवे हॉस्पिटल नागपूर, स्वास्तम हॉस्पीटल नागपूर, संजीवनी हॉस्पीटल मुंबई आदी नामांकित रुग्णालयांचे सहकार्य लाभत आहे. या सर्व उपचारांसाठी पालकांना कोणताही आर्थिक खर्च करावा लागत नाही, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीपासून शाळास्तरापर्यंत बालकांची १०० टक्के आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात येत असून, विविध आजारांचे वेळेत निदान करून तातडीने उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील आरबीएसके योजनेचा हा प्रवास हजारो बालकांच्या नव्या आयुष्याचा आणि त्यांच्या पालकांच्या आनंदाश्रूंचा साक्षीदार ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *