Headlines

आर्थिक गुन्हेगारी रोखणे यंत्रणा व नागरिकांची संयुक्त जबाबदारी:माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन; 'चित्तथरारक' कादंबरीचे प्रकाशन




दहशतवादी संघटना आणि त्यांचे हस्तक देशविरोधी कारवायांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्रोत गैरमार्गाने वापरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील तपास यंत्रणा, सुरक्षा संस्था, पोलिस आणि अन्वेषण संस्थांसोबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी वाढली आहे. आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे आता यंत्रणा आणि नागरिकांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे, असे राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. प्रवीण दीक्षित हे लेखक हेमंत गोडसे यांच्या ‘चित्तथरारक’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. ही कादंबरी आर्थिक गुन्हेगारी, टेरर फंडिंगसाठी त्याचा वापर आणि तपास या विषयावर आधारित आहे. यावेळी राजहंस प्रकाशनाचे संचालक-संपादक डॉ. सदानंद बोरसे, लेखक हेमंत गोडसे आणि अरुंधती दीक्षित व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसिद्ध लेखिका शोभा बोंद्रे आणि शिरीष देशपांडे हेही प्रेक्षागृहात हजर होते. आर्थिक गुन्हेगारी करणारे दहशतवादी आणि त्यांचे हस्तक हे ‘साक्षर असुर’ आहेत, असे प्रवीण दीक्षित म्हणाले. हेमंत गोडसे यांनी कादंबरीसाठी एक वेगळा पण महत्त्वाचा विषय निवडला आहे. हा विषय खूप आव्हानात्मक आहे. गोडसे यांनी रहस्य कायम ठेवत वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवले आहे. विशेषतः आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीचा जागतिक दहशतवादाशी कसा संबंध असू शकतो, यावर त्यांनी सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. गोडसे यांची ही कादंबरी नावाप्रमाणेच ‘चित्तथरारक’ असून, मराठी साहित्यात ती महत्त्वाची ठरेल, असे दीक्षित यांनी सांगितले. दीक्षित पुढे म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यानंतर परिस्थितीत बदल झाला आहे, तरीही धोका कायम आहे. अनेक घटनांच्या तपासातून असे समोर आले आहे की, आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीद्वारे दहशतवादी गट आणि त्यांच्या हस्तकांना आर्थिक मदत पुरवली जात आहे. हे गट नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून देशात आणि समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आणि ‘पोलिसमित्र’ बनणे गरजेचे आहे. लेखक हेमंत गोडसे म्हणाले की, त्यांच्या व्यावसायिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा या कादंबरी लेखनासाठी खूप उपयोग झाला. रहस्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक होती. या लेखनासाठी त्यांनी किमान तीन वर्षे विविध प्रकारच्या संशोधनावर खर्च केली. परदेशी लेखक असे संशोधन सातत्याने आणि वर्षानुवर्षे करतात. त्यांचे संशोधन ही आपली प्रेरणा ठरली, असे गोडसे यांनी सांगितले. व्यक्तिरेखांचे बदलणारे नातेसंबंध कथानकाला कसे कलाटणी देऊ शकतात आणि तपास यंत्रणा कशा काम करतात, याची माहिती वाचकांना कादंबरी पूर्ण वाचण्यासाठी प्रेरित करेल, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *