![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारला जाणारा सेस टॅक्स तातडीने रद्द करावा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडून सेस देणे व घेणे पूर्णपणे बंद केले जाईल, असा इशारा अहिल्यानगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा यांनी २०१७ पासून देशात जीएसटी लागू असतानाही सेस टॅक्स कायम असल्याने व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक तिघांवरही आर्थिक भार पडत असल्याचे सांगितले. हा अन्यायकारक कर रद्द करून त्याऐवजी बाजार समित्यांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेतही २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपाध्यक्ष गोपाल मणियार यांनी मॉल संस्कृतीमुळे व्यापारी वर्ग आधीच अडचणीत असून शासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच नवीन निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे सचिव संतोष बोरा, दीपक बोथरा, विश्वनाथ कासट, अशोक भंडारी, सतीश गुंदेचा, श्याम सचदेव, हिरालाल चोपडा, संजय लोढा, योगेश चंगेडीया, अजित भंडारी उपस्थित होते. सेस टॅक्स रद्द करण्याच्या मागणीसाठी आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी आक्रमक झाले.
Source link
इशारा:बाजार समित्यांकडून आकारला जाणारा सेस टॅक्स रद्द न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन