![]()
गणेश मंडळांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करतानाच समाजोपयोगी उपक्रमही राबवावेत. उत्सवातील आवांतर खर्चाला फाटा देऊन गरजू मुलींसाठी सायकल वाटपासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन राहुरीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले. उत्सव साजरा करताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे; उत्साहाच्या भरात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतल्यास उत्सवाला एक वेगळी शिस्त व प्रतिष्ठा लाभेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी ही मोठी बाजारपेठ असून येथे अनेक नामांकित व मोठी गणेश मंडळे आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात, विद्युत रोषणाई आणि वाद्यांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन होते. आगामी गणेशोत्सव शांततेत, सामाजिक सलोख्याने आणि कोणतीही गालबोट न लागता पार पडावा, या उद्देशाने राहुरी पोलिसांनी वांबोरी दूरक्षेत्र येथे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला विविध मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व शंका जाणून घेतल्या. ते म्हणाले, “पुढची पिढी आपलेच अनुकरण करत असते, त्यामुळे आपल्या सण-उत्सवांमध्ये संस्कृती आणि शिस्त टिकून राहिली पाहिजे. उत्सव काळात कोणतीही अडचण किंवा वाद निर्माण झाल्यास तात्काळ ””११२”” क्रमांकावर संपर्क साधावा. सर्वांनी वादांना पूर्णपणे टाळून कायद्याचे पालन करावे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच सुटका होते असा काहींचा गैरसमज असतो; मात्र एकदा पोलिस दप्तरी नोंद झाली की ती पुसता येत नाही, याचे भान तरुणांनी ठेवावे. विद्यार्थिंनींना सायकल वाटपाची तयारी पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सामाजिक उपक्रमांचे आवाहन करताच बैठकीनंतर अनेक तरुणांनी त्यांची भेट घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. काही मंडळांनी यंदा देखाव्यांच्या अनावश्यक खर्चाला कात्री लावून गावातील गरजू विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्याची तयारी दर्शवली. या स्तुत्य उपक्रमासाठी पोलिस प्रशासनाकडून एक स्वतंत्र समन्वयक उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
Source link
उत्साहाच्या भरात कायदा विसरू नका; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन:राहुरी तालुक्यातील वांबोरीत मंडळांची पोलिस प्रशासनाने घेतली बैठक