![]()
आयकर विभाग आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाचे आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करून कंपनीवर बनावट छापा टाकल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी मुंबई आणि पुण्यातून सहा जणांना अटक केली आहे. या टोळीने कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. हा प्रकार 17 जुलै रोजी अंधेरी पूर्वेतील चाकाळा परिसरातील सहार कार्गो इस्टेटमधील ‘टू एम ऑप्थोट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत घडला. हा संपूर्ण प्रकार अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’ चित्रपटातील बनावट छाप्याची आठवण करून देणारा आहे. कंपनीचे मालक राजकुमार कंदासामी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रोहन सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदासामी आणि त्यांच्या पत्नीला घराजवळ दोन जणांनी अडवले. त्यांनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने एका कॅबमध्ये बसवून कंपनीच्या कार्यालयात नेण्यात आले. कार्यालयात पोहोचल्यानंतर आरोपींनी कंदासामी, त्यांच्या पत्नी तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले. कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर निर्बंध घालून त्यांची चौकशी करण्यात आली तसेच कंपनीतील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी एका आरोपीने कथित शोध वॉरंट दाखवून त्यावर कंदासामी यांची स्वाक्षरी घेतल्याचा आरोप आहे. कंपनीवर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवत आरोपींनी कंदासामी यांना धमकावले. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी प्रकरण ‘सेटल’ करण्याच्या नावाखाली 1 कोटी रुपये देण्याची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेला हा बनावट छापा रात्री सुमारे 8 वाजता आरोपींनी आटोपला. कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जाळ्यात प्रकरणाची गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, निरीक्षक अतुल निकम, सहाय्यक निरीक्षक रामदास कदम, उपनिरीक्षक रोहन सुर्वे, रमेश्वर करपे आणि त्यांच्या पथकाने कॉल रेकॉर्ड, मोबाईल क्रमांक, डम्प डेटा, लोकेशन माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. डीसीपी (वेस्ट झोन-3) दत्ता नलावडे यांच्या देखरेखीखाली तपास करण्यात आला. सरकारी तसेच खासगी ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मुंबई उपनगरातील संतोष खोपटकर (37) आणि विनय मोरे (37) यांचा सहभाग आढळून आला. दोघांना अटक करून त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. दरम्यान, मोबाईल फोन बंद करून ठेवलेल्या प्रेम सबनानी (50) याचा शोध घेत पोलिसांनी त्याला पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घरातून ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे प्रज्ञा एच.एम. (27) हिला अंधेरी पूर्वेतून, तर रेश्मा श्यामराव वारंग (41) हिला नालासोपारा येथून पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींची ओळख शबिना शेख (48), जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे (57) अशी करण्यात आली आहे. जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे हे माणपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका गुन्ह्यात यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत आहेत. बनावट ओळखपत्रे, सरकारी शिक्के आणि वॉरंटचा शोध पोलिसांकडून आता आरोपींकडे असलेली बनावट ओळखपत्रे, सरकारी लोगो, रबर स्टॅम्प, लेटरहेड तसेच कथित शोध वॉरंटची कागदपत्रे शोधली जात आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची तपासणी सुरू असून त्यातील कॉल, चॅट, व्हॉट्सॲप संदेश आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. या माध्यमातून या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, तसेच या टोळीमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध घेतला जात आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अन्य व्यावसायिकांनाही लक्ष्य केले आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात आयकर विभागाशी संबंधित काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी सुरू असून, त्यांच्याविरोधात पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. हेही वाचा.. देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा..
Source link
मुंबईत ‘स्पेशल 26’च्या धर्तीवर बनावट आयकर छापा:व्यावसायिक दाम्पत्याचे अपहरण, 1 कोटींची खंडणी मागितली