![]()
शेतीसह वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अन्न व सुरक्षा, उद्योग आणि पाणी वितरणातील समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. समाजातील स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपाय विद्यार्थ्यांनी शोधावेत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. संजीवनी विद्यापीठात आयोजित ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते. उपजिल्हाधिकारी महेश सावंत, नगराध्यक्ष पराग संधान, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर, मच्छिंद्र पोकळे, हनुमंत फेरे आदी उपस्थित होते. कोपरगाव व ग्रामीण भागातील शेती, शिक्षण, अन्न व सुरक्षा, दळणवळण, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, खुली नवकल्पना, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन अशा विषयांवरील स्थानिक समस्यांवर स्मार्ट पर्याय शोधण्यासाठी देशभरातील १०० टीममधील सुमारे ४०० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठातर्फे एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, आमदार कोल्हे यांनीही एक लाख रुपयांचे अतिरिक्त बक्षीस जाहीर केले. कचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पाला अमित कोल्हे यांच्या वतीने प्रायोजकत्व देण्यात येणार आहे. युवकांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, आर्थिक प्रगतीत युवकांनी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. महेश सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या विकासासोबत निसर्गाशी सुसंवाद राखण्याची गरज व्यक्त केली. अमित कोल्हे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी देणे हे संजीवनी विद्यापीठाचे ध्येय असल्याचे सांगितले. डॉ. ठाकूर यांनी स्वागत करून हॅकॅथॉनची संकल्पना स्पष्ट केली.
Source link
"एआय'द्वारे शेतीसह समस्यांवर स्मार्ट उपाय शोधा- आ. कोल्हे:हॅकॅथॉनमध्ये देशातील 100 टीम सहभागी; 400 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सहभाग, 2 लाखांचे बक्षीस