Headlines

मंत्रघोष, कलश मिरवणूक अन् महादेवाची प्राणप्रतिष्ठा; जुने मोहटे गाव भक्तिमय:मुलींच्या शिक्षणासह गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू : जगताप‎




तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान समितीच्या वतीने जुने मोहटे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच शिवलिंग व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी मोहटे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. गावातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, पाण्याची व्यवस्था, जलसंधारणाची कामे तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे गावात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जगताप यांनी सांगितले. सोहळ्यानिमित्त सकाळी सुवासिनींच्या सहभागातून पारंपरिक कलश मिरवणूक काढण्यात आली. मंदिरासाठी जागा दान दिल्याबद्दल राधाबाई दहिफळे व सविता दहिफळे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथून श्री नर्मदेश्वर शिवलिंग व नंदी मूर्ती उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी सैनिक ईश्वर आश्रूबा दहिफळे यांचाही सत्कार करण्यात आला. वेदशास्त्रसंपन्न नारायणदेव सुलाखे, सच्चिदानंद देशपांडे, भूषण साकरे व रविदेवा जोशी यांच्या पौरोहित्याखाली मंत्रोच्चार व धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. कार्यक्रमास देवस्थान समितीचे विश्वस्त, अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद घेतला. गावाच्या सर्वांगीण विकासालाही चालना मोहटे गावाच्या विकासासाठी देवस्थान समिती कटिबद्ध असून, मुलींचे शिक्षण, पाणीप्रश्न आणि जलसंधारणाला प्राधान्य देण्यात येईल. शासनाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे श्री मोहटादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *