![]()
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दौऱ्यावर होते. शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील दधम आणि व्याळा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि मोताळा तालुक्यातील काही गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, दौरा नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिराने सुरू झाल्याने मोताळा तालुक्यातील तिघ्रा आणि टाकळी या दोन गावांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिवसभर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शिंदेंचा संवाद एकनाथ शिंदे यांनी बाळापूर तालुक्यातील दधम आणि व्याळा गावात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. यानंतर एकनाथ शिंदे खामगाव तालुक्यातील कोलोरी आणि भादोला गावात पोहोचले. येथेही शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पावसाची कमतरता आणि आर्थिक अडचणी याबाबत आपल्या समस्या सांगितल्या. यावेळी एका शेतकऱ्याने आपली परिस्थिती सांगताना भावुक होत आत्महत्येचा विचार मनात आल्याचे सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर हा विचार मनातून दूर झाल्याचे त्याने म्हटले. एकनाथ शिंदे यांनी संबंधित शेतकऱ्याला धीर देत सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले. ‘आत्महत्येचा विचार आला होता…’ अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा गावात समाधान सुरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. सुरकर यांची कान्हेरी गवळी गावात पाच एकर शेती आहे. त्यांच्या शेतात सोयाबीन आणि तुरीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. शेतातील परिस्थिती आणि आर्थिक संकटाबाबत बोलताना सुरकर भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. परिस्थिती इतकी कठीण झाली होती की मनात आत्महत्येचा विचार आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्यानंतर आत्महत्येचा विचार मनातून दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रसंग पाहून एकना शिंदे यांनी त्यांना धीर दिला. मोताळ्यात दोन गावांचा दौरा रद्द दरम्यान, शिंदे यांचा ताफा मोताळा तालुक्यातील रोहीनखेड आणि खडकी खामखेड येथे पोहोचला. या ठिकाणीही त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मात्र, दौरा सुरू होण्यास झालेला विलंब आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी लागलेला वेळ यामुळे नियोजित वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे मोताळा तालुक्यातील तिघ्रा आणि टाकळी या दोन गावांना भेट देणे शक्य झाले नाही. दोन्ही गावांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दिवसभर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड शिंदे आपल्या गावात येणार असल्याने तिघ्रा आणि टाकळी येथील शेतकरी दिवसभर त्यांच्या भेटीची वाट पाहत होते. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडता येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, दौरा रद्द झाल्याचे समजल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना भेट न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. काही शेतकऱ्यांनी यावेळी सरकारच्या दौऱ्याच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यात अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर दुसरीकडे वेळेअभावी दोन गावांना भेट देता न आल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे शिंदे यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला एका बाजूला भावनिक प्रसंगांची किनार होती, तर दुसऱ्या बाजूला दौरा रद्द झालेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या नाराजीचे चित्र पाहायला मिळाले. हेही वाचा…. एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर अर्जुन खोतकरांचा मनोज जरांगेंना थेट इशारा:‘मिशीवर ताव देऊन बोलू नका, आम्हालाही मिशा आहेत’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जरांगे यांनी शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांना इशारा दिला आहे. जालन्यात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा..
Source link
एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट:तिघ्रा-टाकळी गावांकडे फिरवली पाठ, तासन्तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप; सरकारवर थेट निशाणा