Headlines

एखाद्या व्यक्तीचे गुण-दोष स्वीकारून नकारात्मकता विसरल्यास “जीवनानंद’:बार्शीतील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ व्याख्यानमालेत डॉ. उपाध्ये यांचे विचार



कुटुंब आणि समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीचे गुण-दोष स्वीकारून जीवनामध्ये घडणाऱ्या नकारात्मक घटना विसरल्यास आयुष्य जगण्याचा आनंद वाढेल. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका, असे आवाहन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

.

येथील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत “मन करा रे प्रसन्न” या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार एफ. आर. शेख, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, पोलिस निरीक्षक गणेश कुंभार, डॉ. सुनील पाटील, मायबोली सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष जवाहर माढेकर, रावसाहेब मिरगणे, अॅड. श्याम झालटे, सायकलिंग क्लबचे चंद्रकांत बारबोले, संजय श्रीश्रीमाळ आदी उपस्थित होते.

या वेळी उपाध्ये म्हणाले, पैशाच्या मागे धावताना माणसे जीवनातल्या सुख-दु:खांकडे पाठ फिरवत यांत्रिक जीवन जगत आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या व्याधी वाढल्या आहेत. आपण जीवनातल्या सुखांना पारखे झाले आहोत याचे कारण चंगळवाद, भोगवादापासून ते जीवनातले साध्य, साधन, विवेक आपण विसरले आहोत. जीवनामध्ये विद्वत्तेपेक्षाही शहाणपण महत्वाचे असते. त्यामुळे शिक्षणामधून जीवन जगण्याचे ज्ञान मिळाले पाहिजे. प्रास्ताविक अॅड. सचिन शेटे यांनी केले. कार्यक्रमासाठी वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाचे सर्व संचालक मंडळ व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

या वेळी डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, आपल्याला संतसाहित्याची समृद्ध परंपरा आहे. सर्व संतांनी मनाच्या सामर्थ्याबाबत सांगितले आहे. संत तुकारामांनी मनाच्या प्रसन्नतेबाबत सांगितले आहे. मन हे जीवनातल्या सर्व शुध्दीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आपली मनोवृत्ती चांगली असली पाहिजे. समाज, कुटुंब आणि व्यवसायामध्येही कोणती माणसे वाट्याला येतील हे सांगता येत नाही. मात्र या सर्व व्यक्ती आणि प्रसंगांवर कौशल्याने मात करता आली पाहिजे. जीवन आनंदाने जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या जीवनामध्ये काय घडेल हे कधीही सांगता येत नाही. परंतु घडणारी कोणतीही घटना आपल्या चांगल्यासाठीच घडते असे समजून त्यातून आपत्तीला इष्टापत्ती मानण्याचे मानसिक सामर्थ्य विकसित केले पाहिजे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *