![]()
मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्वरित व प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी 5 बटालियन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांनी 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या पथकांची पूर्वतैनाती केली आहे. ही तैनाती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र तसेच एनडीआरएफ मुख्यालय यांच्या समन्वयाने सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, नागपूर आणि उत्तर गोवा येथे करण्यात आली असून ही पथके संपूर्ण मान्सून कालावधीत कार्यरत राहणार आहेत. संतोष बहादुर सिंह, कमांडंट, 5 बटालियन एनडीआरएफ, पुणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि गोवा हे 5 बटालियनचे प्राथमिक कार्यक्षेत्र आहे. संबंधित जिल्ह्यांची भौगोलिक संवेदनशीलता, पूर्वीच्या आपत्तींचा अनुभव तसेच भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजांचा विचार करून पथकांची रणनीतीपूर्वक पूर्वतैनाती करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, पथकांची रणनीतीपूर्वक पूर्वतैनाती केल्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी प्रतिसादाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो, त्यामुळे बचाव व मदतकार्य तात्काळ सुरू करता येते. सर्व पथके अत्याधुनिक शोध व बचाव साहित्य, पूर बचाव उपकरणे, संप्रेषण साधने आणि प्रशिक्षित जवानांसह सज्ज असून जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणांशी सतत समन्वय ठेवून कार्यरत आहेत. त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, एनडीआरएफ नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णतः सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या बचाव व मदतकार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.
Source link
एनडीआरएफची महाराष्ट्र-गोव्यात पथके तैनात:मान्सूनसाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 5 बटालियनची पूर्वतयारी