![]()
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत संचलन (पासिंग आऊट परेड) सोहळा शनिवार, ३० मे रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, गुरुवारी खेत्रपाल परेड मैदानावर अंतिम तालीम (फुल ड्रेस रिहर्सल) यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सोहळ्याद्वारे सुमारे ३५५ कॅडेट्स भारतीय सशस्त्र दलात देशसेवेसाठी दाखल होतील. गुरुवारी झालेल्या अंतिम परेडचे निरीक्षण एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी केले. त्यांनी नियोजित संचलनाचा सविस्तर आढावा घेतला. ३० मे रोजी होणाऱ्या मुख्य परेडचे पुनरावलोकन अधिकारी म्हणून भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित राहतील आणि संचलनाची मानवंदना स्वीकारतील. या तालमीदरम्यान खडकवासलाच्या आकाशात हवाई दलाच्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. लोहगाव हवाई तळावरून उड्डाण करत विमानांनी हवेत विविध कसरती केल्या. यामध्ये सुखोई लढाऊ विमानांची वेगवान उड्डाणे, चेतक हेलिकॉप्टर्सची अचूक फॉर्मेशन्स, जगातील आघाडीचा ‘सारंग’ हेलिकॉप्टर एरोबॅटिक्स संघ आणि ‘आकाशगंगा’ स्कायडायव्हिंग पथकाच्या नेत्रदीपक सादरीकरणाचा समावेश होता. मुख्य परेडच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच शुक्रवार, २९ मे रोजी एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये १५० व्या तुकडीचा शैक्षणिक पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल आणि निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते यशस्वी कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान केली जाईल. शनिवारी पहाटे ६ वाजून ४० मिनिटांनी मुख्य संचलनाला सुरुवात होईल. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कॅडेट्सच्या पालकांसह लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी खडकवासला येथे दाखल झाले आहेत.
Source link
एनडीएच्या १५०व्या पासिंग आऊट परेडची खडकवासल्यात भव्य तालीम:लोहगाव हवाई तळावरून सुखोई, सारंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके; ३० मे रोजी मुख्य सोहळा