![]()
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत, या रवींद्र धंगेकर यांच्या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “मोदी-शहांचा उदोउदो करणे हा बाळासाहेबांचा विचार नाही, हे तर बाळासाहेबांच्या विचारांचे द्रोही आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर आणि आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या राजकीय उलथापालथीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. शिंदेंच्या ‘वारसदार’ दाव्यावर राऊतांचा हल्लाबोल धंगेकरांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत कडाडले, “मोदी-शहांचा उदो-उदो करणे हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का? हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे. ज्या पद्धतीने अमित शहा आणि त्यांचे लोक महाराष्ट्र आणि मुंबई लुटत आहेत, मराठी माणसाच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत आणि मुंबई वेगळी करण्याची योजना आखत आहेत… त्याला पाठिंबा देणे हा बाळासाहेबांचा विचार असू शकत नाही. हे लोक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे द्रोही आहेत.” ‘एप्रिल-मे नंतर देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ’ राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाशी सहमती दर्शवत राऊत म्हणाले, “राज ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे. आम्हीही तेच सांगत आहोत. एप्रिल-मे महिन्यानंतर देशात आणि राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणारच आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत ज्या घडामोडी घडतील, त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्रावर आणि इतर राज्यांवरही नक्कीच पडेल. ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता? राऊत म्हणतात… उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, “का नाही? ते दोघं भाऊ आहेत. ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या रक्ताला तहानलेले नसतात, तसे दक्षिणेकडील राज्यांत होते. आमची वैचारिक लढाई आहे, पण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र असले पाहिजे, ही यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची परंपरा आहे,” असे ते म्हणाले. ठाण्यातील पुणेकर हत्याकांड आणि पोलिसांवर दबाव ठाण्यात झालेल्या प्रदीप पुणेकर हत्याकांड प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी पुन्हा एकदा केला. “पोलीस आयुक्त चांगले आहेत, पण ते दबावाखाली काम करत आहेत. आरोपींना राजकीय आश्रय लाभल्यामुळेच त्यांना अटक होत नाहीये. आम्ही काल ठाण्यात गेलो आणि आलो. आम्ही तिथे लग्नाच्या वरातीत नाचायला गेलो नव्हतो, तर आरोपींना अटक करा हे सांगण्यासाठी गेलो होतो. जर न्याय मिळाला नाही, तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल,” असा इशारा त्यांनी दिला. भाजपला टोला: ‘पक्ष चोरल्याचे त्यांना आता खातंय’ देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “आज तुम्ही ज्या ऐऱ्यागैऱ्यांसोबत बसला आहात, ती काही खरी शिवसेना नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेनेचे तुकडे केले, पक्ष आणि चिन्ह चोरून एका दरोडेखोराच्या हातात दिले, ते आता तुम्हालाही मनातून खात असेल.” ——————— हेही वाचा… उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त तर एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार: भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात; रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक अतिशय मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे हे दोन्ही नेते (ठाकरे-शिंदे) भविष्यात एकत्रही येऊ शकतात,” असे विधान धंगेकर यांनी केले आहे. सविस्तर वाचा
Source link
एप्रिल-मे महिन्यानंतर देशात, महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होणार:संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही भाष्य