Headlines

एमआयटी एडीटी विद्यापीठाचा 11वा वर्धापन दिन:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत ‘विद्यारंभ-26’चे आयोजन




एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाचा 11 वा वर्धापन दिन मंगळवारी, 11 ऑगस्ट 2026 रोजी साजरा होणार आहे. यासोबतच, नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यारंभ-26’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, 12 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आयसीएमआरचे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचा 11वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (11 ऑगस्ट) ‘स्वामी विवेकानंद सभामंडपात’ पार पडेल. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतील. बुधवार, 12 ऑगस्ट रोजी एमआयटी एडीटी विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या 11व्या बॅचसाठी ‘विद्यारंभ-26’ हा तीन दिवसीय स्वागत समारंभ सुरू होईल. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. हे दोन्ही कार्यक्रम विद्यापीठातील ‘स्वामी विवेकानंद सभामंडपात’ हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आदी मान्यवर या कार्यक्रमांना उपस्थित राहतील. वर्धापन दिन आणि ‘विद्यारंभ-26’ या तीन दिवसीय कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, संशोधन, नवोपक्रम व विद्यार्थी विकास उपक्रमांची माहिती दिली जाईल. विद्यापीठात यंदाही मोठ्या संख्येने नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांच्या स्वागतासाठी तीन दिवस विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर सत्रांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘विद्यारंभ-26’ कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना ‘राष्ट्रीय गरिमा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यापीठ, राजस्थानचे कुलगुरू डॉ. आनंद भालेराव, महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचा यात समावेश आहे. या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. नचिकेत ठाकूर यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *