![]()
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमधील भेसळीबाबत गंभीर इशारा दिला आहे. पुण्यात गावठी दारूत विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या असून, भेसळीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, दूध, पनीर आणि खाद्यतेलांप्रमाणेच आता अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेयांचीही तपासणी केली जाईल, असे मुंढे यांनी शनिवारी स्पष्ट केले. खानपानाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी बजावले. खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. चरबीयुक्त, खारट आणि साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. एफडीएने तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू केला असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र नियमानुसार तपासणी सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे बालगंधर्व रंगमंदिरात ‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी बालपणापासूनचा प्रवास, यूपीएससीतील यश-अपयश, प्रशासकीय कारकिर्दीतील कठोर निर्णय आणि अन्न सुरक्षेशी संबंधित धोरणांवर मनमोकळे भाष्य केले. यावेळी तरुणाईला मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले की, प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने आणि सद्विवेकबुद्धीचे पालन केले पाहिजे. केवळ प्रवाहाबरोबर न वाहता समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. फक्त यशाकडे न पाहता अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करा आणि कोणाचेही अंधानुकरण न करता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुणांचा ‘अटेंशन स्पॅन’ कमी झाला असून, स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल न करता विचार करा आणि कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते.’ बदल्यांचा त्रास होत नाही तुकाराम मुंढे म्हणाले, वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,’ अशी रोखठोक भूमिका मुंढे यांनी मांडली. ‘बीयर आणू का?’ या प्रश्नाने दिल्ली सोडली ‘यूपीएससी’च्या तयारीदरम्यान 1996 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. ‘दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला आणि तेथून बसने संभाजीनगर गाठले,’ असे त्यांनी सांगताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. आता ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर घसा बसेल ”बीए झाल्यानंतर एमए राज्यशास्त्र प्रवेशासाठी मी पहिल्यांदाच ‘लालपरी’ एसटीने पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर बसस्थानकावरून पुणे विद्यापीठात पायी गेलो. प्रवेश मिळत होता, परंतु वसतिगृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या सायंकाळी मला निराश होऊन परत जावे लागले. नंतर यूपीएससीच्या तयारीदरम्यान जयकर ग्रंथालय आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात अभ्यास केला. मित्राच्या खोलीवर ‘पॅरासाईट’ म्हणून राहताना ढेकणांमुळे रात्र-रात्र झोप यायची नाही. त्या काळात चायनीज गाड्यांवर मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एमए’ करताना परिस्थितीमुळे ऑम्लेट-पाव आणि फरसाण-केळी हेच ‘स्टेपल डाएट’ होते. आता मी ते ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर माझा घसा बसेल,’ अशी आठवण तुकाराम मुंढे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. शाळेतच पहिला ‘बदली’चा अर्ज तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रतिमेशी जोडलेला एक रंजक किस्साही यावेळी समोर आला. ‘ताडसुर्णा गावातील शाळेत आठवीत असताना भूगोलाचा एकही धडा शिकविला जात नसल्याची तक्रार आम्ही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. ‘आम्हाला या शिक्षकाची बदली पाहिजे,’ असा ‘आदेश’ असे लिहिलेला अर्ज आपण केला होता आणि त्यानंतर त्या शिक्षकाची बदलीही झाली,’ अशी आठवण त्यांनी सांगितली. कोणत्याही व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे. व्यवस्थेने नियमांनुसार काम केले पाहिजे. अधिकारी येतील-जातील; मात्र व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी उत्तरदायित्व आणि कार्यपद्धतीची संस्कृती विकसित झाली पाहिजे. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
Source link
"मद्य आणि पेयांमधील भेसळ खपवून घेणार नाही!":तुकाराम मुंढेंचा इशारा; वेटरने बीयर आणू का विचारताच दिल्ली सोडले, मुंढेंनी सांगितले अनेक किस्से