![]()
पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 पात्र शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील या 38 हजार 970 शेतकऱ्यांची एकूण थकबाकी 345 कोटी 25 लाख 5 हजार 594 रुपये इतकी होती. ही रक्कम थेट संबंधित बँकांकडे वर्ग झाल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. राज्यात या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे 6 लाख 22 हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण 5 हजार 28 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. याशिवाय, सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. यामुळे कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार असून, खरीप हंगामासाठी त्यांना आवश्यक आर्थिक आधार मिळणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांच्या कर्जखात्यावरही कर्जमुक्तीची रक्कम थेट वर्ग केली जाईल.
Source link
पुण्यातील 38,970 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती:पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांचा दिलासा