![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता कायदेशीर वळण मिळाले आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणावरून शेख यांनी केलेल्या वक्तव्यांवर आता पोलिसांच्या कारवाईची टांगती तलवार आली आहे. या प्रकरणात मेहबूब शेख यांनी MPSC पेपरफुटीतील एका आरोपीचे अभिमन्यू पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच या माध्यमातून पेपरफुटीच्या कथित रॅकेटचे राजकीय संबंध असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, या आरोपांवरून पवार यांची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणात किल्लारी पोलीस ठाण्यात वकील अशोक बेद्रे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे MPSC पेपरफुटी प्रकरणावरून लातूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई झाल्याचे समोर आले आहे. नेमकं प्रकरण काय? MPSCच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासात आतापर्यंत सहा जणांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटीची प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत कशी पोहोचली, त्यामागे कोण होते आणि या प्रकरणात आयोगातील व्यक्तींचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाला सुरुवातीपासूनच राजकीय रंग मिळाला होता. MPSCने सुरुवातीला पेपरफुटीच्या आरोपांचे खंडन केले होते. त्यानंतर उमेदवारांकडून तक्रारी आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी पुढे गेली. याच काळात मेहबूब शेख यांनी सातत्याने या मुद्द्यावर सरकार आणि MPSCवर टीका केली होती. शेख यांनी एका पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरण केवळ काही आरोपींपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठे जाळे असल्याचा दावा केला होता. MPSCच्या यंत्रणेतच या प्रकरणाची पाळेमुळे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुख्य सूत्रधार MPSCमध्ये बसला आहे मेहबूब शेख यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये MPSCच्या अंतर्गत यंत्रणेवरही गंभीर आरोप करण्यात आले होते. “आता दूध का दूध, पाणी का पाणी झालं. MPSC सगळं नाकारणारच, कारण याची पाळंमुळं MPSCमध्ये आहेत. पेपरफुटीचा मुख्य वितरक MPSCमध्ये बसलेला आहे. आता दलाल आणि ग्राहकांना अटक झाली आहे; पण मुख्य सूत्रधार MPSCमध्ये नागासारखा ठाण मांडून बसला आहे,” अशा आशयाचे वक्तव्य शेख यांनी केले होते. पेपरफुटीच्या प्रकरणात काही जणांना अटक झाल्यानंतरही तपास अपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचण्याची मागणी केली होती. अभिमन्यू पवारांवर काय आरोप केले होते? या प्रकरणातील एका आरोपीचे नाव समोर आल्यानंतर मेहबूब शेख यांनी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी त्या व्यक्तीचे कथित जवळचे संबंध असल्याचा दावा केला होता. शेख यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती अभिमन्यू पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याची माहिती होती. तसेच पुण्याच्या महापौरांशी संबंधित कामही तो पाहत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या व्यक्तीच्या माध्यमातून पेपरफुटीचे कथित रॅकेट पुढे गेले असावे, अशी चर्चा असल्याचेही शेख यांनी म्हटले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच आता अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याचा आरोप करत मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शेख यांनी केलेले आरोप हे त्यांचे राजकीय दावे असून, त्यातून अभिमन्यू पवार किंवा संबंधित व्यक्तीचा पेपरफुटीतील सहभाग सिद्ध झालेला आहे, असे म्हणता येत नाही. या आरोपांबाबत तपास यंत्रणांकडून अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. माझे फोटो ट्विट करू नका, अशी विनंती झाली मेहबूब शेख यांनी आपल्या वक्तव्यात आणखी एक दावा केला होता. संबंधित व्यक्तीच्या पत्नीचे नाव गुणवत्ता यादीत आल्याने आपण सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि माहिती शेअर केली होती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडून तसेच त्याच्या परिचित आणि काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन आले. आपले नाव घेऊ नये, भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत किंवा इतर नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत आणि संबंधित पोस्ट हटवावी, अशी विनंती करण्यात आल्याचा दावा शेख यांनी केला. मात्र, आपण पोस्ट हटवण्यास नकार दिला आणि संबंधित व्यक्तीला चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले, असेही शेख यांनी म्हटले होते. या फोननंतर संबंधित व्यक्ती घाबरल्यामुळे त्याचा या प्रकरणात सहभाग असावा, असा निष्कर्ष आपण काढल्याचेही शेख यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. हा एकच पेपर फुटलेला नाही MPSC पेपरफुटीचा प्रकार केवळ एका प्रश्नपत्रिकेपुरता मर्यादित नसल्याचाही दावा मेहबूब शेख यांनी केला होता. “हा एकच पेपर फुटलेला नाही. MPSCचे अनेक पेपर फुटले आहेत,” असा आरोप त्यांनी केला होता. औषध निरीक्षक परीक्षेतील एका उमेदवाराचा कथित संदेश आणि संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणावरून सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले होते. पेपरफुटीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत, सरकारमधील अनेक लोक या कथित पेपरफुटीच्या चक्रव्यूहात अडकले असल्याचे शेख यांनी म्हटले होते. आता पोलिसांच्या तपासाकडे लक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांचे नाव घेतल्याने त्यांच्या वक्तव्यांची पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात मेहबूब शेख यांची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते कायदेशीर मार्गाने काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, MPSC पेपरफुटीच्या मूळ प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यामुळे पेपरफुटीची प्रत्यक्ष साखळी, आरोपींचे परस्पर संबंध, प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याचा मार्ग आणि यामध्ये कोणत्याही सरकारी किंवा राजकीय व्यक्तीचा सहभाग होता का, याबाबत तपासातून काय निष्पन्न होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… MPSC पेपरफुटीत सरकारी पाठिंबा, मंत्री झिरवळांचीही चौकशी करा!: संजय राऊतांचा गंभीर आरोप, झिरवाळांच्या OSDचे आरोपीच्या घरातील वास्तव्य चर्चेत एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे धागेदोरे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय असे पेपर फुटणे शक्यच नाही, असे सांगत त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या चौकशीची थेट मागणी केली आहे. झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मागील महिनाभरापासून बेपत्ता असून, ते पेपरफुटीतील मुख्य आरोपीच्या घरात भाड्याने राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण:आमदार अभिमन्यू पवारांची बदनामी भोवली; राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल