Headlines

‘एसआयआर’साठी काँग्रेस पक्ष सज्ज:जिल्हाध्यक्षांद्वारे पदाधिकाऱ्यांना टिप्स




मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरु केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत अलिकडेच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाण्यासाठी काही टिप्स दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे व निर्देशांचे प्रत्येक स्तरावर पालन करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-१’ (बीएलए-१) यांची तातडीने नियुक्ती करून त्यांचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेळेत सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिवाय ”मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-२ यांची नियुक्ती करून त्याची माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवता यावा आणि प्रतिनिधींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय ‘एसआयआर समन्वय समिती’ स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसतर्फे मदत केंद्र सुरू केले जाईल. या केंद्राच्या माध्यमातून चुकीने वगळलेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ भरण्यास मदत केली जाईल तसेच बोगस किंवा दुबार मतदारांच्या विरोधात नमुना क्रमांक ७ दाखल केला जाईल, असेही ठरविण्यात आले. गरज पडल्यास वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपील करण्यासाठी मतदारांना मार्गदर्शन केले जाईल. “मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काँग्रेसची प्राथमिक जबाबदारी आहे. एसआयआर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने बूथ स्तरापर्यंत सक्रिय राहून काम करणे गरजेचे आहे, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *