Headlines

ऑनलाईन गेमिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक, 2 आरोपी गजाआड:पुण्यातील अ‍ॅमेनोरा मॉल, फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा




पुणे पोलिसांनी हडपसर आणि फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नामांकित अ‍ॅमेनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साहित्य आणि बेकायदेशीर पिस्तूल जप्त केले आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार शिवाजी जाधव आणि योगेश राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हडपसर येथील अ‍ॅमेनोरा मॉलमध्ये दोन आणि फुरसुंगी येथे एक अशा एकूण तीन ठिकाणी बनावट कॉल सेंटर्स सुरू होती. ‘अ‍ॅपेक्स अँच्यूवर’ आणि ‘जेकेएल इंडिया सोल्यूशन’ या नावांनी चालवल्या जाणाऱ्या या कॉल सेंटर्समध्ये तब्बल 120 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेकडो लोकांची फसवणूक केली जात होती. लोकांना बनावट ऑनलाईन गेमिंगच्या वेबसाईटद्वारे पैसे जिंकण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. पोलिस उपायुक्त परिमंडळ 6 चे जीवन बेनीवाल यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासणिक, गिरिशा निंबाळकर, अमोल मोरे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या स्वप्नाली शिंदे यांच्या पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. सलग 18 तास चाललेल्या या कारवाईत विविध संगणक, हार्डडिस्क, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संतोष दत्ता वैजणेकर (वय 47, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि विनायक उर्फ दीपक मनोहर इक्के (वय 40, रा. फुरसुंगी) या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपी संतोष वैजणेकर याच्या घरातून रोख रक्कमेसह एक बेकायदेशीर पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, आयटी अ‍ॅक्ट, ऑनलाईन गेमिंग अ‍ॅक्ट, आर्म्स अ‍ॅक्ट आणि जे.जे. अ‍ॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *