Headlines

ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा; उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक




महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची आता उघडपणे चर्चा सुरू झाली असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. “शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडणारे ‘ऑपरेशन टायगर’ आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल,” असा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. जाधवांच्या या विधानामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील सुनेगावमध्ये एका औषध निर्माण कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. दानवेंच्या विधानाचा दाखला देत जाधवांची कोंडी आपल्या दाव्याचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांच्याच एका वक्तव्याचा शस्त्र म्हणून वापर केला. जाधव म्हणाले, “या ऑपरेशनबाबत आम्हाला आता अधिक काही बोलण्याची गरजच उरलेली नाही. कारण स्वतः ‘उबाठा’चे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीच काही खासदार संपर्कात असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्यामुळे आमच्या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.” काय म्हणाले होते अंबादास दानवे? वास्तविक पाहता, अंबादास दानवे यांनी या घडामोडींवर बोलताना, “काही लोक संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलतात. लोकसभा निवडणुकीपासून दर दोन महिन्यांनी खासदार संपर्कात असल्याची चर्चा होते, हे आम्हाला सर्व माहीत आहे; आता हे अधिकृतपणे मान्य करायला हवे,” असे उद्विग्न उद्गार काढले होते. दानवे यांच्या याच विधानाचा धागा पकडत प्रतापराव जाधवांनी ठाकरे गटाला पुरते घेरले आहे. महाराष्ट्रात विकृतीने कळस गाठला!; राऊतांचा पलटवार अंबादास दानवे यांच्या विधानानंतर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. राऊत म्हणाले, “ही महाराष्ट्राच्या राजकारणातील निव्वळ विकृती आहे आणि या विकृतीने आता कळस गाठला आहे. या लोकांनी अवघा महाराष्ट्र नासवून टाकला असून, योग्य वेळ येताच राज्यातील जनता या दळभद्री राजकारणाविरोधात तीव्र बंड करेल.” तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ची भाषा करणाऱ्यांना टोला लगावताना, “आमचे ऑपरेशन करायला निघणाऱ्यांचे स्वतःचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कितीवेळा ऑपरेशन केले, हे आधी त्यांनी जाहीर करावे,” असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केला. उद्या ‘मातोश्री’वर तातडीची बैठक! ठाकरे गटाचे ७ ते ८ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या आणि काही दिवसांपूर्वी दिल्लीत गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांमुळे ‘मातोश्री’वरील चिंता वाढली आहे. मध्यंतरी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतलेली भेट, तसेच धाराशिवच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांची असलेली गैरहजेरी यामुळे संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. या संभाव्य पडझडीला रोखण्यासाठी आणि पक्षांतर्गत रणनीती आखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या, १४ जून रोजी मुंबईतील आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची तातडीची आणि महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले असून, उद्याच्या या बैठकीत ठाकरे आपल्या शिलेदारांना एकत्र ठेवण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *