‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड शहरातील ‘एस.एम. एजन्सी’ या अन्न विक्री प्रतिष्ठानावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा मानके व नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले असून, २ लाख ९६ हजार ३८० रुपये किमतीचा ६२६ किलो भेसळयुक्त व अपमिश्रित अन्नाचा साठा सीलबंद करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान या एजन्सीमधून २ लाख १३ हजार १८० रुपये किमतीची ५०० ग्रॅमची ८३६ पाकिटे (४१८ किलो) मिरची पावडर आणि ८३ हजार २०० रुपये किमतीची ५०० ग्रॅमची ४१६ पाकिटे (२०८ किलो) हळद पावडर असा एकूण २,९६,३८० रुपयांचा साठा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त केला. मानकांनुसार केलेल्या तपासणीत या एजन्सीला ५२ पैकी केवळ ४० गुण मिळाल्याने तिला थेट ‘अपात्र’ घोषित केले. दुकानात स्वच्छतेचा अभाव, कामगारांची वार्षिक वैद्यकीय आरोग्य तपासणी न करणे आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा नसणे अशा त्रुटी आढळल्या. जप्त केलेला साठा पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अन्न सुरक्षेशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
Source link
कन्नडला भेसळयुक्त अन्नाचा 2.96 लाखांचा साठा हस्तगत:अन्न सुरक्षा मानकांसह नियमांचे केले उल्लंघन