![]()
शहरातील ५५ हजार जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत कन्नड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या भूमिगत पाणी साठवण टाकीही बांधण्यात येत आहे. कामाची नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल जावेद आणि डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कामाचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना मुख्याधिकारी रवींद्र लांडे म्हणाले की, कन्नड शहराची लोकसंख्या आता ५५ हजारांच्या वर गेली आहे. सध्याची जलशुद्धीकरण यंत्रणा अत्यंत जुनी झाली असून, मागणी व पुरवठा यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने सद्यस्थितीत शहराला ८ ते ११ दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने नगरविकास विभागामार्फत ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. आधुनिक पद्धतीने या ठिकाणी अव्याहतपणे लाखो लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाईल. वैज्ञानिक पद्धतीने पाण्यातील माती, गाळ आणि शेवाळ काढून ते पाणी शुद्धीकरणानंतर मुख्य विहिरीत सोडले जाईल व तिथून पंपिंग करून जलकुंभांद्वारे नागरिकांना पुरवले जाईल. ही नवीन योजना आगामी २०५८ या सालापर्यंतची वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. पूर्वीची ८ एमएलडी आणि आताची नवीन ५ एमएलडी अशी मिळून शहराची एकूण जलशुद्धीकरण क्षमता १३ एमएलडी होणार आहे. योजनेचा भाग म्हणून कन्नड शहरातील शासकीय विश्रामगृह व नगरपरिषद कर्मचारी निवासस्थान परिसरात साडेसहा लाख लिटर क्षमतेची, तर सिंचन भवन भागात साडेचार लाख लिटर क्षमतेची अशा दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्रालगत एक मोठी पाणी साठवण टाकीही बांधण्यात येत आहे. शहरातील प्रलंबित कामांना गती मिळाली शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी आणि सुरळीत वितरणासाठी तब्बल ६० किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. विकास महर्षी अप्पासाहेब नागदकर अंबाडी धरणातून गुरुत्वाकर्षण बलाने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येते. या धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत दोन किलोमीटर लांबीची नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद म्हणाल्या की, “आम्ही विकासकामांत कधीही राजकारण करणार नाही आणि विकासकामांत आडवे येणारे राजकारण खपवूनही घेणार नाही, या स्पष्ट धोरणामुळेच शहरातील प्रलंबित कामांना गती मिळाली आहे.
Source link
कन्नड शहरात 60 किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यास सुरुवात:दोन पाण्याच्या आणि एक साठवण टाकीचे काम प्रगतिपथावर