![]()
आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासात अनेक जिल्हे आले, पण अमरावतीने दिलेले प्रेम आणि इथल्या ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान शब्दांत मांडता येणार नाही,”असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेच्या स्थानांतरित सीईओ संजिता महापात्र यांनी काढले.
.
सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाल्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांत र्फे त्यांना निरोप तसेच नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांचा स्वाागत समारंभ घेण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी आपले मन मोकळे केले. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या निरोप आणि स्वागत समारंभात भावना आणि नव्या ऊर्जेचा संगम पाहायला मिळाला. निरोप समारंभावेळी आपल्या आठवणींना उजाळा देताना त्या कमालीच्या भावूक झाल्या होत्या.
संजीता महापात्र यांचे वडील सक्तीपाडा महापात्र, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्वेता पवार, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता धावडे, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भावना व्यक्त करताना सहकारी अधिकारी म्हणाले, महापात्र यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे अमरावती जिल्ह्याची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड यामुळे जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून संजिता महापात्र यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला. शिवाय नवनियुक्त सीईओंचे स्वागतही केले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन सीईओंचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महापात्र यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास रथ अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प केला.
नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी म्हणाले की, “संजिता महापात्र यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या विकासाचा जो उच्चांक प्रस्थापित केला आहे. तो कायम राखण्याचे आणि पुढे नेण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. या पदभारामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली असून, पारदर्शक प्रशासन आणि विकासकामांना गती देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.