![]()
‘जनगणना से जनकल्याण’ हे घोषवाक्य असलेल्या १६ व्या भारतीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी व घरगणना) प्रत्यक्ष कामासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सेवाभाव प्रतिज्ञा व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांनी १ ते १५ मे या कालावधीत जनगणनेच्या वेब पोर्टलवर प्रत्येकाने स्वगणना करून सेल्फ इनुमिरेशन आयडी प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान फिल्ड ट्रेनर निलेश भामरे यांनी एचएलओ ॲपमधील तांत्रिक बाबी, डिजिटल डेटा संकलन, घरांची स्थिती, कुटुंबातील सोयी-सुविधा आणि मालमत्तेची माहिती संकलित करणे, नकाशा तयार करणे आणि प्रत्यक्ष गृहभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. कळवण तालुक्यातील ३३५ घर गटांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यासाठी एकूण ४३१ प्रगणक व पर्यवेक्षकांना पीपीटीद्वारे प्रशिक्षित केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी भरत पाटील, भास्कर भामरे, संभाजी पवार, प्रवीण भामरे, चंद्रकांत खिरोळकर आदी फिल्ड ट्रेनर म्हणून ७ मे पर्यंत नऊ स्वतंत्र गटांना मार्गदर्शन करत आहेत. तहसील कार्यालयातील अनिल पाटील, शरद राऊत, रवी पवार आणि दीपक पवार हे प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. या नवीन डिजिटल प्रणालीमुळे मानवी चुकांची शक्यता कमी होणार असून, संकलित झालेला डेटा थेट मुख्य सर्व्हरवर जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःचा मोबाईल वापरून ही माहिती भरता येणार असल्याने कामात सुटसुटीतपणा येणार आहे. ही भारताची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असेल. सर्व माहितीचे संकलन प्रथमच पूर्णपणे डिजिटल साधनांद्वारे केले जाईल. कुटुंबांना १ ते १५ मे दरम्यान वेब पोर्टलवर स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान पार पडणार असून, दुसरा टप्पा १ मार्च २०२७ रोजी होईल. प्रगणक प्रत्येक कुटुंबाकडून एकूण ३४ प्रश्नांची उत्तरे संकलित करतील आणि ही सर्व माहिती गोपनीय राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Source link
कळवणला 431 कर्मचाऱ्यांना जनगणनेचे प्रशिक्षण:तहसीलदार वारुळे यांनी दिली गोपनीयतेची शपथ; डिजिटल पद्धतीने होणार संकलन