![]()
नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत श्री एकदंत गणेश मित्र मंडळ आणि शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या भूतकोला नृत्याने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘कांतारा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कर्नाटकातील पारंपरिक लोककलेच्या धर्तीवर वराह रूपम, गुलिगा देव आणि भूतकोला नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दहा कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे मिरवणुकीला थरारक आणि अद्भुत स्वरूप प्राप्त झाले. श्री मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान येथून सुरू झालेली शोभायात्रा चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, गंगुबाई तालीम, नवरंग व्यायामशाळा, बागडपट्टी, पुणे मार्गे पुन्हा मंदिरात दाखल झाली. मार्गातील प्रत्येक चौकात नागरिकांची मोठी गर्दी होती. भूतकोला कलाकारांचे आकर्षक वेशभूषा, रंगभूषा आणि प्रभावी देहबोली पाहण्यासाठी नागरिकांची पावले थांबत होती. मुख्य कलाकाराने साकारलेले वराहदेवाचे रूप विशेष लक्षवेधी ठरले. गुलिगा देव आणि अन्य पारंपरिक रूपांसह अग्नितांडवाची झलक, आगीचे फवारे आणि नृत्याच्या प्रभावी हालचालींनी वातावरण भारावून गेले. अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये या कलाविष्काराचे चित्रीकरण केले. या सादरीकरणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या एलईडी स्क्रीनवर दक्षिण भारतातील पारंपरिक कला, सांस्कृतिक कथानके आणि ॲनिमेशन दाखवण्यात आले. पारंपरिक लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरला. या उपक्रमासाठी ऋषिकेश सामल, ओंकार बुरगुल, अमर सादुल यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. धार्मिक मिरवणुकीला सांस्कृतिक वैविध्याची जोड देणाऱ्या या प्रयोगामुळे यंदाची मार्कंडेय शोभायात्रा नगरकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.
Source link
‘कांतारा’ थाटात अवतरला वराहदेव:मार्कंडेय शोभायात्रेत भूतकोला नृत्याचा थरार; एलईडी दृश्यांनी नगरकर मंत्रमुग्ध