Headlines

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी:वारकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज, एकनाथ शिंदेंकडून चंद्रभागेच्या घाटांची पाहणी




कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या व्यवस्थापनासाठी पंढरपूर नगरपालिकेला 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळासह आधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कार्तिकी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंढरपूर येथे जाऊन वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मोटारसायकलवरून शहरातील काही भागांची पाहणी केली. त्यानंतर चंद्रभागा नदीच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारत नदीच्या दोन्ही तीरांवरील स्वच्छता, घाट, स्नानगृहे, शौचालये आणि इतर सुविधांचा आढावा घेतला. पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यात्रेच्या नियोजनाची माहिती दिली. यात्रेसाठी यंदा मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी विविध ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना शुद्ध मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज; स्वच्छतागृहांची दिवसातून 4 ते 5 वेळा स्वच्छता यात्रा काळात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असून, शहरातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी करून आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. स्वच्छतेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून 4 ते 5 वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचीही शिंदे यांनी स्वतः पाहणी केली. तेथील स्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता तपासल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. यात्रेदरम्यान स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रभागा परिसरात स्नानगृहे, चेंजिंग रूम आणि वॉटर प्युरिफायर कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागा नदी परिसरात वारकऱ्यांना स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ठिकठिकाणी वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसविण्यात आली आहे. महिलांसह सर्व भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम, शौचालये आणि स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटांची स्वच्छता आणि परिसरातील सुविधांवरही विशेष लक्ष दिले जात आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या घाटांमुळे भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी न होता वेगवेगळ्या भागांत विभागली जाण्यास मदत होणार आहे. याशिवाय रेल्वे परिसरातील सुमारे 65 एकर जागेचाही यात्रेच्या नियोजनासाठी उपयोग करण्यात येत आहे. गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. यात्रेच्या काळात वाहतूक, गर्दी आणि भाविकांच्या हालचालींचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि बसण्याची व्यवस्था विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत तासन्तास उभे राहावे लागू नये, यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना दर्शनासाठी प्रतीक्षा करताना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यात्रेदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नियोजनाच्या पाहणीदरम्यान काही त्रुटी किंवा उणिवा आढळल्यास त्या तातडीने दूर करण्यात येतील. भाविकांच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत स्वच्छता, आरोग्य आणि पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर प्रशासनाने लक्ष ठेवावे, असे निर्देशही देण्यात आले. शिंदेंनी स्वतः हातात घेतला पाण्याचा पाइप; चंद्रभागेच्या पायऱ्यांची केली स्वच्छता पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रभागा नदीच्या तीरावर पोहोचले. यावेळी प्रशासनाकडून पायऱ्यांवर पाणी मारून स्वच्छता केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कर्मचाऱ्यांच्या हातातील पाण्याचा पाइप स्वतःच्या हातात घेतला आणि चंद्रभागेच्या पायऱ्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. शिंदे यांनी स्वतः स्वच्छतेत सहभाग घेतल्याने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. यानंतर त्यांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारला. नदीच्या दोन्ही तीरांवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांची पाहणी केली. घाटांची स्थिती, स्वच्छतागृहे, स्नानगृहे आणि इतर व्यवस्थांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. या पाहणीवेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख महेश नाना साठे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणदास चवरे, शिवाजी सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा…. पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड:बॅटरी लो झाल्याने इंजिन सुरू होईना, अखेर कारने पुण्याकडे रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यातील कार्यक्रम आणि पाहणी पूर्ण करून ते मुंबईला परतण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरची बॅटरी लो झाल्यामुळे त्याचे दुसरे इंजिन सुरू होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्याचा नियोजित प्रवास रद्द करावा लागला. अखेर एकनाथ शिंदे यांनी कारने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावरून विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *