![]()
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी १० तास कसून चौकशी केली. या प्रकरणात दिलेल्या नोटिसीनुसार मतीन पटेल सोमवारी नाशिक पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला. तो सोमवारी पोलिसांना शरण येणार असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवार,२४ मे रोजीच दिले होते. सोमवारी सकाळी ११:३६ वाजता मतीन पटेल दोन वकिलांसह नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला. एसआयटीच्या विशेष दालनात ही चौकशी झाली. सुमारे १० तास त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याचा मोबाइल जप्त केला. याच प्रकरणात आता संबंधित मोठ्या नेत्याला लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. मतीन पटेल आणि त्यांचे वकील अभयसिंह भोसले यांना चौकशी संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्या वेळी भोसले यांनी स्पष्ट केले की, पटेल यांना एसआयटीने चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार ते हजर झाले. पोलिस अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. तसेच चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली. आता १ जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मोबाइल उलगडणार रहस्य मतीन पटेल याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. २३ मार्च ते निदा खानवर झालेल्या अटक कारवाईच्या कालावधीत मतीन कुणाच्या संपर्कात होता, याचे गुपित मतीनचा मोबाइल उलगडणार आहे. सलग १० तासांच्या मॅरेथॉन चौकशीत एसआयटीने प्रश्नांची सरबत्ती केली असता, काही खळबळजनक दावे केले असून त्याच्या दाव्यांमधील सत्यताही मोबाइलच्या तपासणीत समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. मतीनच्या चौकशीतून टीसीएसमधील आणखी काही घटनांचाही उलगडा होऊ शकतो. निदा खानच्या जामिनावर ३० मे रोजी नाशिक रोड कोर्टात सुनावणी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खान कारागृहात आहे. तिने नाशिक रोड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी शनिवार, ३० मे रोजी होणार आहे. दोषारोपपत्र दाखल झाले असून खटला सुरू झाल्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
Source link
काॅर्पोरेट जिहाद:नगरसेवक मतीनची 10 तास कसून चौकशी, नाशिकला पुढील सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश