Headlines

कुंदेवाडीत रखडलेल्या रेल्वे पुलामुळे 30 मिनिटे कोंडी:खासदार भगरेंच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना‎




पिंपळगाव–निफाड रस्त्यावरील कुंदेवाडी रेल्वे स्टेशनजवळील गेट क्रमांक ९९ येथे मंजूर उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, सध्या ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते, उर्वरित खांब आणि अन्य कामे अपूर्ण असल्याने रेल्वे फाटक बंद होताच वाहनांच्या रांगा लागत असल्याने सुमारे ३० मिनिटे कोंडी होत आहे. याचा फटका हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारकांना बसत असून, खासदार भास्कर भगरे यांनी काम तातडीने गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रश्नाबाबत खासदार भगरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घोडे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. निफाडच्या बाजूने काम करण्यास कोणताही अडथळा नसल्याने त्या बाजूचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे व बांधकाम विभागाने समन्वय साधून उर्वरित कामाला गती द्यावी, अशी मागणीही केली.मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पोहोच रस्ते व अन्य कामे अपूर्ण असल्याने प्रकल्प रखडला आहे. पिंपळगाव हे मोठे कांदा बाजारपेठ केंद्र असल्याने मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. रेल्वे गाड्यांच्या ये-जा वेळी गेट २० ते ३० मिनिटे बंद राहिल्याने कोंडी होते. काम पूर्ण करण्यासाठी ठोस वेळमर्यादा निश्चित करून संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार भगरे यांनी केली. उड्डाणपुलाच्या कामासाठी कुंदेवाडीतील काही घरकुले विस्थापित होणार आहेत. संबंधित नागरिकांची तात्पुरती निवासव्यवस्था करून पर्यायी जागेवर पक्की घरे उपलब्ध करावीत, अशी मागणी खासदार भगरे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *